काँग्रेसची गोची; दिल्लीत राहुल गांधी, गेहलोत, कमलनाथ यांच्या पदांबाबत घेतला जाणार निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर काँग्रेसची पुरती गोची झाली आहे. एककीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत तर दुसरीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर राहुल गांधी भडकल्यामुळे त्यांची पदे धोक्यात आली आहेत.

सध्या दिल्लीतील राहुल गांधी यांच्या निवासस्थानी एक बैठक सुरू असून या बैठकीला काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडेरा उपस्थित आहेत. या बैठकीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट देखील उपस्थित आहेत. दरम्यान सोमवारी गेहलोत यांनी राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र त्यांना वेळ नाकारण्यात आल्याचे समजते.

पराभवानंतर ‘चिंतन’ करताना काँग्रेस वर्किंग कमिटी बैठकीत राहुल गांधी यांनी नेत्यांच्या ‘पुत्रप्रेमा’वर ताशेरे ओढले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मुख्यमंत्री कमलनाथ, पी. चिदंबरम यांनी मुलांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. कमलनाथ यांचे पुत्र कसेबसे विजयी झाले तर राजस्थानात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही.