
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपले सरकारी निवासस्थान सोडले आहे. पण असे असतानाही या दोन्ही बंगल्यात राहण्यास भाजपचा एकही मंत्री तयार नाही. याचे कारण विचारता या दोन्ही बंगल्यात वास्तुदोष आहे. यामुळेच जेटली व स्वराज यांची प्रकृती बिघडली व त्यामुळेच त्यांना आपली पदे सोडावी लागली, असे अजब उत्तर ऐकायला मिळत आहे.
अर्थमंत्री झाल्यानंतर जेटली या बंगल्यात राहण्यास आले होते. मात्र येथे आल्यापासून त्यांच्या मागे शुक्लकाष्ट मागे लागली. तब्येतीच्या अनेक तक्रारी सुरू झाल्या. याआधी या बंगल्यात काँग्रेस नेते आणि माजी दूरसंवाद मंत्री सुखराम हे राहत होते. पण तेही टेलीकॉम घोटाळ्यात अडकले. त्यानंतर समाजवादी पक्षाचे संरक्षक आणि माजी केंद्रीय मंत्री मुलायम सिंह यादव यांचे देखील या बंगल्यात वास्तव्य होते. बंगल्यात राहायला आल्यापासून तेही वरचेवर आजारी पडू लागले होते, असेही भाजपच्या एका नेत्याने म्हटले आहे.
सुषमा स्वराज या सी 7 लाईन्स येथील सरकारी बंगल्यात राहत होत्या. पण त्यांच्यानंतर या बंगल्यात वास्तुदोष असल्यानेच त्या आजारी पडायच्या अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे बंगला रिकामा असूनही त्यात राहण्यास कोणीही तयार नाही.



























































