
सामना ऑनलाईन । मुंबई
आयआयटी मुंबईच्या आवारात गुरूवारी एक विचित्र घटना घडली होती. कॅंम्पसमधील एका विद्यार्थ्याला दोन बैलांच्या झुंजेची धडक बसली असून तो विद्यार्थी या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला होता. या पीडित मुलाचे नाव अक्षय पी एल (21) असे आहे.
गुरूवारी सकाळी अक्षय आपल्या मोबाईलवर गुंतलेला होता. तेव्हा आपल्या सायकलजवळ चालत जात असताना अचानक दोन बैल झुंज करत त्याच्या अंगावर धावून आले. त्यापैकी एका बैलाचा जोरदार धक्का त्याला बसला त्यामुळे तो खाली कोसळला व बैल त्याच्यावरून धावत गेला. या दुर्घटनेनंतर अक्षयच्या पोटाला गंभीर जखमा झाल्या व त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले.
विक्रोळीतील सुश्रुशा रूग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले व त्याची प्रकृती आता स्थिरावली असून त्याला लवकरच घरी सोडण्यात येणार आहे. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी या यापूर्वीही आवारात भटकणारी जनावरे आणि कुत्र्यांबद्दल आयआयटीच्या प्रशासनाकडे तक्रार केली होती. ही संपूर्ण दुर्घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली व सोशल मीडियावर चांगलीच वायरल झाली आहे.




























































