एलआयसीची फसवणूक करणाऱ्याला न्यायालयीन कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

एलआयसीच्या योजनेअंतर्गत 99 लाख 30 हजार रुपयांचा गैरव्यवहार करुन एलआयसीची फसवणूक केल्याच्या प्रकरणात उक्कलगाव (ता.मानवत) येथील आरोपी बाळासाहेब नारायण झाडे याच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (दि.16) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.कादरी यांनी दिले. प्रकरणात यापूर्वी 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

प्रकरणातील आरोपी बाळासाहेब नारायण झाडे (39, रा. उक्कलगाव, ता. मानवत) याला 6 जुलै रोजी पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने झाडेला 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीने बालाजी नारायण झाडे, बाबासाहेब हरिभाऊ झाडे अशा विविध नावांनी बँकेचे खाते उघडल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच आरोपीच्या पत्नीचे नाव गंगासागर असून आरोपी झाडे याने तीचे नाव बदलून गंगूबाई या नावाने बँकेचे खाते उघडले असल्याचे देखील समोर आले आहे. काही पासबुकवर एलआयसीकडून 30 हजार रुपये जमा झाल्याच्या नोंदी आहेत. तसेच आरोपींकडून विविध लोकांचे बनावट आधारकार्ड देखील मिळाले आहेत. त्या अनुषंगाने आरोपीची चौकशी केली असता त्याने बाळासाहेब पौळ नावाची व्यक्ती खोटे आधारकार्ड बनवित असल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपीच्या घरी झडतीत सुभाषचंद्र बोस विद्यालय (मानवत) व जेबीके विद्यालय (ता. जाफ्राबाद, जि. जालना) या दोन शाळेचे बनावट निकालपत्र सापडली असून हे निकालपत्र एलआयसीची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी बनाविण्यात येत होते. हे बनवाट निकालपत्र पठाण नावाची व्यक्ती बनवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान आरोपी झाडे याची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक सरकारी वकील एस.आर.ढोकरट यांनी आरोपीने पत्नी व त्याचे नाव बदलून उघडलेल्या बँक खात्यांमधील व्यवहाराबाबात तपास करावयाचा आहे. पांडुरंग क्षिरसागर हा आरोपीचा सासरा असून त्याने सासर्‍याला मयत दाखवून पत्नीच्या नावे एक लाख रुपये उचलले आहेत. तसेच बनावट आधारकार्ड बनविणार्‍या बाळासाहेब पौळ याचा शोध घेवून त्याला अटक करणे आहे. आरोपीने अपहार केलेल्या रकमेतून काही मालमत्ता खरेदी केली असल्याची शक्यता असल्याने त्या अनूषंगाने तपास करणे आवश्यक आहे. आरोपीकडे मिळालेल्या पासबुकमधील पहिले पान फाडून टाकलेले असून त्याबाबत तपास करावयाचा असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कादरी यांनी ही विनंती मान्य करीत आरोपी झाडेच्या कोठडीत मंगळवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.