
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडला असताना शिवसेनेच्या वतीने शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्यात यावी, बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ 25,000 ची नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांचे वीज बिल सरसकट माफ करावे,अतिवृष्टीमुळे 100 टक्के नुकसान झाल्याचे विमा कंपन्यांनी कुठलाही निकष न लावता सरसकट पीक विमा मंजूर करावा, शेतकऱ्यांच्या मुलांची शालेय व महाविद्यालयातील फी सरसकट माफ करावी. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी शासनाच्या वतीने मोफत बी-बियाणे वाटप करण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले व मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात अशी विनंती करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, विलास महाराज शिंदे, जि. प.सदस्य गणपत डोईफोडे, बीड तालुक्यातील सर्व शिवसैनिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























































