गेल्या आठवड्यात शीव येथे एका तरुणाला एक लाख 28 हजार किमतीच्या बनावट नोटांसह रंगेहाथ पकडल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट- 4 ने त्यापुढे जाऊन आणखी मोठी कारवाई केली. अटक तरुणाने तामीळनाडूतील ज्या व्यक्तीकडून त्या बनावट नोटा घेतल्या होत्या त्याच्या घरावर छापा टाकून सात लाख 55 हजार रुपये किमतीच्या आणखी बनावट नोटा हस्तगत केल्या.
युनिट-4 च्या पथकाने 3 मार्च रोजी किंग्ज सर्कल येथे सापळा रचून भास्कर नाडर या तरुणाला दोन हजार, 500 व 200 रुपये दराच्या एकूण एक लाख 28 हजार रुपयांच्या बनावट नोटांसह पकडले होते. त्यानंतर भास्करकडे कसून चौकशी केल्यावर तामीळनाडूतील सर्वनन वनियार याने मुंबईतील एका इसमाला देण्यासाठी त्या नोटा दिल्या होत्या असे निष्पन्न झाले. याची गंभीर दखल घेत प्रभारी निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राजेश पाटील व पथकाने तामीळनाडूतील अय्यानुर गाव गाठले. तेथे राहणार्या सर्वनन याच्या घरावर छापा टाकल्यावर तेथे 500 रुपये दराच्या 1476, 200 रुपये दराच्या 85 अशा एकूण सात लाख 55 हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. तसेच या बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे स्कॅनर, प्रिंटर, पेपर कटर, कात्री, हिरवट रंगाचा प्लॅस्टिक रोल आदी साहित्यदेखील मिळून आले.
तारखेला आला आणि लटकला
भास्करविरोधात ऍण्टॉप हिल पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. त्या गुह्याच्या तारखेसाठी तो मुंबईत आला होता. तो मुंबईत येत असल्याने सर्वनन याने त्याच्याकडे एक लाख 28 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा मुंबईत एका इसमाला देण्यासाठी दिल्या होत्या. त्यानुसार भास्कर बनावट नोटा घेऊन आला, पण लटकला.
- गेल्या महिन्यात मुंबई गुन्हे शाखेने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 23 लाख 86 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.
- त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-9 ने तिघा आरोपींना दोन लाख 95 हजार किमतीच्या बनावट नोटांसह रंगेहाथ पकडले होते. तेदेखील तामीळनाडूचे होते.
























































