रायगड जिल्ह्यातील 25 जोडप्यांचे घटस्फोट टळले, संसाराचा मोडलेला डाव पुन्हा उभा राहिला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कौटुंबिक वादातून घटस्फोटापर्यंत 25 जोडप्यांचे ताणलेले संबंध पोलिसांच्या पुढाकाराने जुळून आले आहेत. रायगड पोलीस दलातील महिला अधिकारी व कर्मचाऱयांनी या जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांना विभक्त होण्यापासून परावृत्त केले. त्यामुळे संसाराचा मोडलेला डाव पुन्हा एकदा उभा राहिला आहे. खाकी वर्दीच्या या उल्लेखनीय कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणामुळे होणाऱ्या भांडणामुळे विभक्त होण्याची भूमिका घेतली जाते. त्यातून त्यांच्या मुलांचीदेखील फरफट होते. कौटुंबिक वाद, पतीचे व्यसन, पत्नीस पतीकडून मारहाण तसेच इतर कारणाने पती-पत्नीमध्ये भांडण होतात. अशावेळी एकमेकांसोबत जीवनभर साथ निभावण्याची घेतलेली शपथ कुठेतरी नष्ट होते आणि मग पती-पत्नी विभक्त होण्याचा निर्णय घेतात. यातून अनेक वर्षे न्यायालयीन लढाई द्यावी लागते. जिल्ह्यातील असे 25 जोडपेही वादविवादामुळे घटस्फोटापर्यंत पोहोचले होते. या 25 जोडप्यांची जिल्हा पोलीस दलातील महिला कक्ष विभागाकडून समुपदेशन करून मोडणारे संसार वाचवण्यात आले आहेत. या समुपदेशनामध्ये महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, विधितज्ञ, समाजसेविका, वात्सल्य ट्रस्ट प्रतिनिधी यांच्या मदतीने 25 जोडपे आज आपला संसार पुन्हा नव्याने करू लागले आहेत.

सासू-सुनेचा केला सत्कार
जिल्हा पोलीस दलातर्फे महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी स्कतंत्र महिला कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाच्या माध्यमातून महिलांच्या समस्या अडचणी सोडवण्यात येत आहेत. तसेच आता भरोसा सेलही स्थापन केल्याने महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्याही लवकर सुटण्यास मदत होणार आहे. जिह्यातील 25 मोडणारे संसार पुन्हा उभे राहिल्याने विधी सेवा व लायन्स क्लबतर्फे सासू-सुनेबरोबरच महिला अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला.