
कोरोना रोखण्यासाठी देशभरात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यात देशभरातील सर्व हॉटेल व्यवसाय बंद राहणार आहेत. यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. उत्पन्नच बंद झाल्याने या उद्योगातील जवळपास 70 लाख नोकऱ्या संकटात सापडल्या आहेत.
‘नॅशनल रेस्तराँ असोसिएशन ऑफ इंडिया’ने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. हॉटेल उद्योेगाची वार्षिक उलाढाल 4 लाख कोटींच्या घरात आहे. यात जवळपास 70 लाख थेट रोजगार आहेत. मात्र सध्या हा उद्योेग संकटात सापडला आहे. कोरोनामुळे सारा देश लॉकडाऊन झाला आहे. कामगारांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांकडे पुरेशी आर्थिक क्षमता उरलेली नाही, असे अध्यक्ष अनुराग कटियार यांनी सांगितले. सध्या रोजगार कपात होऊ नये, हे हॉटेल आणि रेस्तरॉं उद्योगापुढे आव्हान आहे. त्याशिवाय जे तरुण उद्योजक या व्यवसायात उतरले आहेत त्यांच्या भवितव्याबाबत चिंता सतावत आहे, असे कटियार यांनी सांगितले. कोरोनासारख्या राष्ट्रीय संकटात केंद्र सरकारने हॉटेल उद्योगाला पाठबळ द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार गेल्याच आठवड्यात त्यांच्या सदस्यांसाठी कोरोना अॅडव्हायजरी जारी केली होती. त्यात 31 मार्चपर्यंत हॉटेल पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश सदस्यांना देण्यात आले होते. या स्थितीत हॉटेल व्यावसायिकांचे उत्पन्न शून्य झाले आहे. त्याशिवाय येत्या काही महिन्यांमध्ये ते 50 टक्क्यांहून कमी असेल. त्यामुळे मासिक खर्च, कामगारांचे वेतन आणि इतर खर्च कसा भागवणार, असा प्रश्न हॉटेल व्यावसायिकांना भेडसावत आहे, असे कटियार यांनी सांगितले. त्यामुळे या उद्योगात बेरोजगारी वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.




























































