राजस्थान सीमेवर आयएसआय हेर अटकेत; सीमेवर पाकड्यांच्या कुरापती वाढल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी सीमेवर पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या कुरापती मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. राजस्थानच्या बारमेर सीमेवर शनिवारी हिंदुस्थानी लष्कराने आयएसआयच्या एका एजंटला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याला चौकशीसाठी जयपूर येथे पाठवण्यात आले आहे, तर जम्मू-कश्मीरच्या केरन सेक्टरवर घिरट्या घालणाऱ्या पाकिस्तानी क्वाडकॉप्टरला सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी क्षेपणास्त्र डागून जमीनदोस्त केले. हे क्वाडकॉप्टर चिनी बनावटीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एलओसीवर ड्रोन आणि क्वाडकॉप्टर्स पाठवून हेरगिरी करण्यासोबतच ड्रोनने दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवण्याचा कट आयएसआयने पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने आखल्याची माहिती हिंदुस्थानी गुप्तचरांना मिळाली आहे. त्यामुळे पाकिस्तानला लागून असलेल्या सर्व सीमांवर हिंदुस्थानी लष्कर अलर्ट आहे. राजस्थान सीमेवर पडलेले पाकचे क्वाडकॉप्टर चीनच्या सीजेआय कंपनीने बनवले आहे. याआधीही जम्मू-कश्मीरच्या पीर पंजाल रेंजवर दहशतवाद्यांसाठी ड्रोनने शस्त्रे पाठवण्याचा प्रयत्न हिंदुस्थानने उघडकीस आणला होता.

ड्रोनने सीमेवर बॉम्बिंगचा आयएसआयचा कट
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने एलओसी आणि अन्य हिंदुस्थानी सीमांवर ड्रोनने बॉम्ब टाकण्याचा भीषण कट रचल्याची माहिती हिंदुस्थानी गुप्तचरांना मिळाली आहे. त्यामुळे सीमेवर हिंदुस्थानी जवान अधिकच सतर्क झाले आहेत. पाकिस्तानी लष्कर हिवाळ्याची बर्फवृष्टी होण्याआधी हिंदुस्थानात दहशतवाद्यांची घुसखोरी घडवण्याचा प्रयत्न सतत करीत आहे. पण हिंदुस्थानी लष्कराने आयएसआयचे सर्व प्रयत्न हाणून पाडल्याने आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर सीमेवर हल्ले घडवण्यासाठी ड्रोन्सचा वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.