
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणारून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयला टीकेचे लक्ष्य केले आहे. सुशांतसिंहची आत्महत्या की हत्या हे सीबीआयने स्पष्ट करावे, अशी मागणी अनिल देशमुख यांनी आज नागपूरमधील पत्रकार परिषदेत केली.
सुशांतसिंह राजपूत प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवून चार ते पाच महिने झाले आहेत. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. सीबीआयने लवकरात लवकर या केसच्या तपासाचा अहवाल लोकांसमोर ठेवावा कारण राज्याचा गृहमंत्री या नात्याने लोक मला सतत हाच प्रश्न विचारतात, असे अनिल देशमुख म्हणाले.
या केसबद्दल केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील लोकही अतिशय उत्सुकतेने सीबीआयच्या तपासाची वाट बघत आहेत. सीबीआयच्या तपासाचा अहवाल कधी बाहेर येतो याची वाट बघत आहेत. कारण या तपासामुळे ही हत्या होती की आत्महत्या होती याबाबतचे सत्य जनतेसमोर येईल. त्यामुळे सीबीआयने लवकर याबाबतचे खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली.
नागपूरमधील गुन्ह्यांचे प्रमाण कमी
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत नागपूरमध्ये गुन्हे 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत. गुन्ह्यांची राजधानी अशी गेल्या काही वर्षांत झालेली नागपूरची ओळख आता पुसून काढणार असल्याची ग्वाहीही अनिल देशमुख यांनी दिली.सुशांतसिंह राजपूत प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवून चार ते पाच महिने झाले आहेत.




























































