
पुण्यातील कल्याणीनगर सॉफ्टवेअर कंपनीतील तब्बल 70 लाख रूपयांचे नेटवर्किंग साहित्य चोरणार्यासह दोघांना येरवडा पोलिसांनी 24 तासाच्या आतमध्ये अटक केली. त्यांच्याकडून 52 लाख 50 हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गणेश धोंडिराम डोलारे (वय 31, रा. नर्हे ) आणि कुलदीप रामकरण चौहान (वय 33, रा. बांद्रा इस्ट, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मकरंद बेलुलकर रा. आंबेगाव बुद्रूक यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कल्याणीनगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीतील नेटवर्किंगचे 70 लाखांचे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी येरवडा पोलिस तपास करीत असताना, त्यांनी संशयित गणेश डोलारे याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने कंपनीतील वायफाय अॅक्सेस पॉइंट चोरल्याची कबुली दिली. चोरलेले साहित्य त्याने मुंबईतील कुलदीपला विकल्याचे सांगितले. त्यानुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, किरण घुटे, अमजद शेख, नवनाथ मोहिते, मनोज कुदळे यांच्या पथकाने कुलदीपला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून 52 लाख 50 हजारांचे नेटवर्किंग साहित्य जप्त केले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, अमजद शेख, नवनाथ मोहिते, मनोज कुदळे, किरण घुटे, गणेश वाघ, अनिल शिंदे, सुनील नागलोत, सुनील सकट, राहूल परदेशी, अजय पडोळे, समीर भोरडे, संजय भरगुडे यांच्या पथकाने केली.




























































