
दुकान अथवा हॉटेलांमध्ये आधी फिल्डिंग लावायची. मग कॅश काऊंटरजवळ आपली स्वॅप मशीन घेऊन उभे राहायचे. एखादा ग्राहक सापळ्यात मिळताच त्याची नजर चुकवून त्यांच्याकडील क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आपल्या मशीनमध्ये स्वॅप करायचे. त्यानंतर मिळालेल्या डेटावरून बनावट क्रेडिट/डेबिट कार्ड बनवून लूटमार करणाऱया चौघांच्या गुन्हे शाखा युनिट-9 च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.
बँकेच्या ग्राहकांनी त्यांची बँक संबंधातील कोणतीही माहिती तसेच ओटीपी नंबर कोणालाही दिला नसतानाही त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढले जात असल्याची तक्रार एचडीएफसी बँकेच्या कॉर्पोरेट ब्रँचच्या उपव्यवस्थापकाने युनिट-9 कडे दिली. याची तत्काळ दखल घेत प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामदास कदम व श्रीराम घोडके या पथकाने गुह्याचा तपास केला. तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये बनावट कार्डचा वापर करून पैशांचा गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खबऱयांचे जाळे पसरवून माहिती काढल्यावर अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी अंधेरीतील त्या हॉटेलच्या परिसरात येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्या परिसरात सापळा रचून पोलिसांनी यशवंत गुप्ता, अझरुद्दीन अन्सारी, इस्तियाक अहमद खान यांना अटक केली. त्यानंतर त्यांचा चौथा साथीदार मोहम्मद फैज चौधरी याला पकडले. आरोपींकडून एक स्किमर, नऊ मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले कार्ड, तीन मोबाईल, 27 हजार रोख असा मुद्देमाल जप्त केला. फैज चौधरी याच्या विरोधात अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असून आरोपींनी अद्यापपर्यंत किती नागरिकांची फसवणूक केली याचा पोलीस शोध घेत आहेत.


























































