
मुंबईत गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रात एकाच महिन्यात तब्बल चार हजारांची वाढ झाली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईत 3 लाख घरांमधील 12 लाख रहिवासी कठोर नियमांच्या कचाटय़ात सापडले आहेत. गेल्या दहा दिवसांत तर 2 हजार 207 प्रतिबंधित क्षेत्रे वाढली असून रुग्ण दुपटीचा कालावधी थेट 215 वरून 109 दिवसांची घसरण होत 106 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोना रोखण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घ्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिकेने वर्षभराच्या लढय़ाने फेब्रुवारीत कोरोनावर पूर्ण नियंत्रण मिळवले. जानेवारीअखेर तर दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या 334 पर्यंत खाली आली होती. मात्र फेब्रुवारीच्या मध्यावर कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने पालिकेचे आव्हान वाढले आहे. 21 मार्च रोजी तर दैनंदिन रुग्णसंख्येने वर्षभरातील उच्चांक गाठत 3775चा आकडा गाठल्याने कोरोना खबरदारीच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असून स्थिती नियंत्रणात असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अशी बिघडली स्थिती
मुंबईत 20 फेब्रुवारी रोजी चाळी-झोपडपट्टय़ांमध्ये 93 कंटेनमेंट झोन आणि 1305 सील इमारती मिळून 1398 प्रतिबंधित क्षेत्रे होती. यामध्ये वाढ होऊन 21 मार्च रोजी एकूण प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 5277 वर पोहोचली आहे. गेल्या दहा दिवसांत तर एकूण 3070 प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 2207 ने वाढून 5277 वर पोहोचली आहे.
सद्यस्थिती
- 316 इमारती, 4921 मजले सील, चाळी-झोपडपट्टय़ांमध्ये 40 कंटेनमेंट झोन
- चाळी-झोपडपट्टय़ांच्या 61 हजार घरांमधील 2 लाख 59 लाख रहिवासी, 316 संपूर्ण सील इमारतींमधील 22 हजार घरांमधील 79 हजार रहिवासी आणि 4921 सील मजल्यांवरील 8 लाख 43 लाख रहिवासी अशा एकूण 2 लाख 97 हजार घरांतील 11 लाख 81 हजार रहिवासी प्रतिबंधांमध्ये आहेत.
सक्रिय रुग्णही वाढताहेत
मुंबईत सध्या कोरोनाचे 21 हजार 335 सक्रिय रुग्ण आहेत. महिनाभरापूर्वी केवळ 6900 सक्रिय रुग्ण होते. म्हणजेच 30 दिवसांत 14435 रुग्ण वाढले असून गेल्या दहा दिवसांत 10 हजार 599 सक्रिय रुग्ण वाढले आहेत.



























































