
कोरोना संसर्ग रोखण्यात प्रभावी ठरलेली जगातील प्रत्येक लस हिंदुस्थानात मिळणार आहे. विदेशात ज्या लसींना आपत्कालीन मंजुरी मिळाली आहे, त्या सर्व लसींचा हिंदुस्थानात वापर करण्यासाठी केंद्र सरकार तातडीने मंजुरी देणार आहे. लस तुटवडय़ाचे टेन्शन दूर करण्यासाठी केंद्राने मंगळवारी हा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशातील कोरोना लसीकरणाला गती मिळणार आहे.
हिंदुस्थानने अनेक देशांत कोरोना लसींची निर्यात केली. मात्र सध्या आपल्याच देशात लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे मंदावलेल्या लसीकरणाला गती देण्यासाठी ‘नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन वॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19’ या तज्ञांच्या ग्रुपने सरकारला काही उपाय सुचवले होते. वेगवेगळ्या देशांनी ज्या ज्या कोरोना लसींना आपत्कालीन मंजुरी दिली आहे त्या लसी हिंदुस्थानात आयात करता येतील, असा प्रस्ताव तज्ञांनी मांडला होता. हा प्रस्ताव केंद्र सरकारने मंगळवारी मान्य केला. या निर्णयाची देशात लसींची आयात करण्यात तसेच लसीकरण मोहिमेला गती देण्यात मदत होईल, असा दावा सरकारने केला आहे. तसेच औषध कंपन्यांना विदेशी लसींची हिंदुस्थानात निर्मिती करण्यासाठी मंजुरी मिळवणे सोपे ठरणार आहे.
- केंद्र सरकारच्या आदेशात अमेरिका, युरोप, ब्रिटन, जपान आणि डब्ल्यूएचओशी संबंधित संस्थांचा उल्लेख आहे. यात यूएस फूड ऍण्ड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन, युरोपियन मेडिसिन एजन्सी, यूके एमएचआरए, पीएमडीए जपान व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा समावेश आहे.
- जगभरात जवळपास 270 लसींची निर्मिती सुरू आहे. यातील 13 लसींना वेगवेगळ्या देशांमध्ये आपत्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे फायजर, मॉडर्नाबरोबर जॉन्सन ऍण्ड जॉन्सनची लस हिंदुस्थानात तत्काळ उपलब्ध होणार आहे.
100 कोरोनाग्रस्तांवर सात दिवस चाचणी
विदेशातील ज्या लसींना तातडीची मंजुरी दिली जाईल, त्या लसींची पुढील सात दिवस 100 कोरोनाग्रस्तांवर चाचणी केली जाईल. त्यांच्या आरोग्यावर लसीचा काही साइड इफेक्ट झाला का ते तज्ञांद्वारे पाहिले जाईल. त्यानंतरच देशातील लसीकरण मोहिमेत संबंधित विदेशी लस वापरली जाईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.



























































