
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार होते, तेव्हा पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या प्रश्नांमध्ये भाजपच्या नेत्यांनी कधी लक्ष घातले नाही. आता मात्र केंद्रातून पैसे आणून 35 गावच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावतो, असे देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. जेव्हा तुमच्या हातात होते, तेव्हा तुम्ही केले नाही. त्यामुळे तुमच्या लबाड आश्वासनाला इथली जनता आता भुलणार नाही. भारत भालके यांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन शिवसेनेचे नेते राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
आपल्या खान्देशी स्टाईलने शाब्दिक फटकेबाजी करीत पाटील यांनी पंढरपूरच्या शिवतीर्थावरील महाविकास आघाडीची सभा गाजविली. भाजप आणि आमचे लव्ह मैरेज होते हे लव्ह का तुटले कोणामुळे तुटले सर्वांना माहीत आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात एक आमदार द्या, राज्यात परिवर्तन घडवितो. भाजपचे 105 आहेत. एक दिला तर 106 झाले 106 म्हणजे सत्ता स्थापण्याचे संख्याबळ झाले का…हे कोणाला वेड्यात काढायला लागले. आमचे 170 आहेत समजा त्यापैकी एक आमदार कमी झाला तर उरले किती 169 ना…एक कमी झाला म्हणून सत्ता परिवर्तन होते का… असा सवाल उपस्थित करीत पाटील यांनी फडणवीस यांच्या विधानावर पलटवार केला.
मी गेली दोन दिवस झाले पंढरपूर मध्ये आहे. लोकांचा कानोसा घेतला. कै. भालके नानांनी जे लोकांना प्रेम दिले त्याचे सुखदुःख वाटून घेतलं, याची इथल्या मतदारांना जाण आहे. नानांचा मुलगा भगीरथ भालके भाषण करीत असताना समोर बसलेल्या महिला नानांच्या आठवणीने रडत होत्या. भारत भालके हा काही हायफाय नेता नव्हता. तो गोरगरिबांचा नायक होता. नडल्या आडल्या लोकांचा तो दाता होता सामान्यांचा कैवारी होता. माझी आणि नानांची अकरा वर्षांपासून मैत्री होती. मित्र अचानक गेला त्याचे दुःख आहे पण त्याचा वारसा आणि नानांचे अधर्वट स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढयातील जनतेने भगीरथ भालकेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंधारणमंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तामामा भरणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, आमदार अमोल मेटकरी, यशवंत माने, संजय शिंदे, दीपक पाटील, कल्याणराव काळे, भगिरथ भालके, दिलीप सोपल, उत्तमराव जानकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, भैरवनाथ शुगरर्सचे अनिल सावंत, युवराज पाटील, संदीप मांडवे, संतोष सुळे, दिलीप धोत्रे, दीपक पवार, किरण घाडगे, श्रेया भोसले आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.





























































