स्मार्टफोनचा अतिवापर करताय… सावधान! लॉकडाऊनमध्ये ‘स्क्रीन टाईम’ झाला दुप्पट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शाळा आणि ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदारांचा स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. अगदी मधल्या वेळेत करमणुकीसाठीदेखील टॅब, स्मार्टफोनचा वापर होत असल्याने कोरोना काळात स्क्रीन टाइम जवळपास दुप्पट म्हणजे तीन तासांवरून पाच तासांपर्यंत वाढल्याचे एरिक्सन मोबिलिटीच्या अहवालातून पुढे आले आहे. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. एकाएकी स्मार्टफोनचा वापर कमी करणे शक्य नसले तरी काही सोप्या मार्गांनी हा वापर आपण नक्कीच कमी होऊ शकतो.

असा लावा स्क्रीन टाइमला लगाम…

  • चॅट किंवा एसएमएस पाठवण्याऐवजी फोनवरून प्रत्यक्ष एकमेकांशी बोला. चॅट करताना काही क्षणांची चर्चा दहा मिनिटेही लांबू शकते, परंतु फोन केल्यानंतर तेच काम दोन मिनिटांत होते.
  • मोबाईलवर कमीत कमी ऍप्स ठेवा. आवश्यक तेवढेच ऍप्स मोबाईलमध्ये ठेवा. गेम्स खेळण्याची वेळ निश्चित करा.
  • स्क्रीनपासून कटाक्षाने दूर राहण्याचा कालावधी ठरवा. शक्यतो रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मोबाईलपासून लांब रहा.
  • संशोधनानुसार लोक पलंगावर पडून गॅझेटचा सर्वाधिक वापर करतात. हा मोह टाळाच. त्यामुळे बेडरूममध्ये टीव्ही किंवा संगणक शक्यतो ठेवू नका.

वाढता कापर, आजाराला निमंत्रण

गॅझेट्सच्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम आहेत. डिजिटल व्हिजन सिंड्रोम ही समस्या निर्माण करते. त्यातून तणाव, झोप न येणे, डोकेदुखी, मान व खांदेदुखी, दृष्टी कमजोर होणे, डोळ्यात कोरडेपणा आणि वेदना या समस्या निर्माण होतात. त्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ करताना किंवा ऑनलाइन शिक्षण घेताना डोळ्यांची काळजी घ्या. स्क्रीन डोळ्यांपासून 20 ते 28 इंच दूर ठेवा, दर 15-20 मिनिटांनी डोळ्यांना विश्रांती द्या, डिव्हाईसवर ब्ल्यू लाइट फिल्टरचा वापर करा, मोबाईल गेम्सऐवजी कॅरम, सापशिडी, ल्युडोसारखे गेम्स खेळा असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.