
कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये आयपीएलमधील महत्त्वाची लढत उद्या मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार आहे. ओएन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सला चार लढतींमधून फक्त एकाच लढतीत विजय संपादन करता आला आहे. संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सलाही चार सामन्यांमधून एकाच लढतीत ‘जय’ मिळवता आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता उद्या दोन्ही संघ विजयासाठीच मैदानात एकमेकांसोबत लढतील. या विजयामुळे आयपीएलमधील उर्वरीत लढतींमध्ये दोन्ही संघांतील खेळाडूंना आत्मविश्वास मिळवता येणार आहे.
फलंदाजी विभागात मेहनत घेण्याची गरज
कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना या स्पर्धेत अद्याप सूर गवसलेला नाहीए. नितीश राणाने सुरुवातीच्या लढतींमध्ये ठसा उमटवला. पण त्यानंतर त्याच्याकडून निराशा झालीय. शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, ओएन मॉर्गन यांनाही सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला आहे. दिनेश कार्तिक व आंद्र रस्सेल यांनी मागील लढतीत दमदार कामगिरी केली. पण त्यांना चेन्नई सुपरकिंग्सविरूद्धच्या लढतीत संघाला विजय मिळवून देता आलेला नाही. त्यामुळे फलंदाजी विभागात मेहनत घेण्याची गरज आहे.
गोलंदाजांनाही जबाबदारी घ्यावी लागेल
कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनाही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. वरूण चक्रवर्ती, पॅट कमिन्स, प्रसिध कृष्णा, आंद्रे रस्सेल यांनी टप्प्याटप्प्यात चांगली कामगिरी केलीय. त्यांच्या कामगिरीत सातत्य असायला हवे. सुनील नारायणला मागील लढतीत संधी देण्यात आली. त्याच्याकडूनही मोठय़ा अपेक्षा बाळगल्या जात आहेत. संघातील प्रत्येक गोलंदाजाने आपली जबाबदारी ओळखून खेळ करायला हवा.
स्टोक्स, आर्चरच्या अनुपस्थितीचा फटका
राजस्थान रॉयल्सला आयपीएलच्या यंदाच्या मोसमात जोफ्रा आर्चर व बेन स्टोक्स या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका बसतोय. दोघेही दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकलेले नाही. ख्रिस मॉरीस, डेव्हिड मिलर, मुस्तफिजुर रहमान व जोस बटलर या परदेशी खेळाडूंकडून अद्याप अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. ख्रिस मॉरीसने एक लढत जिंकून दिली, पण इतर लढतींमध्ये त्याला चमक दाखवता आलेली नाही.
संजू सॅमसनला खेळ उंचावावा लागेल
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने पहिल्या लढतीत खणखणीत शतक झळकावले आहे. पण त्यानंतर त्याला सातत्याने अपयशाचा चेहरा पाहावा लागत आहे. याआधीच्या आयपीएलमध्येही तेच घडले होते. कर्णधार आणि फलंदाज म्हणून त्याने इतर खेळाडूंसमोर चांगल्या खेळीसह आदर्श उभा करायला हवा. त्याने आपला खेळ उंचावण्याची गरज आहे.
आजची आयपीएल लढत
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
मुंबई, रात्री 7.30 वाजता





























































