
वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी रंगमंचावर पाय ठेवणाऱ्या ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर (82) यांचे कोरोनाने मंगळवारी निधन झाले. कलाभूषण रघुवीर खेडकर यांच्या त्या मातोश्री होत. गेल्या आठवडय़ात त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील बहुतेक सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.
1939 साली जन्मलेल्या कांताबाई सातारकर यांनी वयाच्या नवव्या वर्षी रंगमंचावर पाय ठेवला होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी आसपासच्या काही तमाशा मंडळांमध्ये कामही केले. 1953 साली त्यांनी तुकाराम खेडकर यांच्या तमाशा मंडळात काम सुरू केले आणि शेवटपर्यंत त्या या तमाशा मंडळात राहील्या. 1954 साली त्यांनी तुकाराम खेडकर यांच्यासोबत विवाह केला. यानंतर त्या ‘तुकाराम खेडकरसह कांताबाई साताकर’ या तमाशा फडाच्या मालकीण बनल्या. त्यांना अलका, अनिता, रघुवीर व मंदा अशी चार अपत्ये आहेत. आज ही सर्व मंडळी तमाशा मंडळातच काम करतात.
कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित, अभिजित, नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे.
लोककलेतील तपस्वी व्यक्तिमत्त्व हरपले
तमाशासह लोककला क्षेत्रात आपले आयुष्य वेचणाऱ्या कांताबाईंनी कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करताना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने लोककला क्षेत्रातील एक तपस्वी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.




























































