
देशात ‘डेल्टा प्लस’ या नव्या कोरोना विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. या विषाणूच्या प्रसाराचा वेग आणि त्याची संसर्गाची क्षमता कोरोनाच्या इतर स्वरूपाच्या विषाणूंपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे या विषाणूचे रुग्ण आढळलेल्या महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळलेल्या भागात निर्बंध घातले जावेत असेही सांगितले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वरील तीनही राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. देशात डेल्टा प्लसची लागण झालेले 22 रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. त्यातील 16 रुग्ण हे महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगावमध्ये आढळले आहेत. केरळमधील पलक्कड आणि पथ्थनमथिता तर मध्य प्रदेशातील भोपाळ आणि शिवपुरी या जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने घबराट वाढली आहे. तज्ज्ञांच्या एका गटाने कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा अभ्यास केला. त्या आधारेच केंद्राने राज्यांना अत्यंत दक्ष राहण्यास सांगितले आहे.

























































