
तुम्ही जर कोविशील्ड लस घेतली असेल आणि युरोपामध्ये कामासाठी किंवा फिरायला जायचं असेल तर तुमचा प्रवास अवघड होण्याची दाट शक्यता आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ग्रीन पास नावाची संकल्पना उदयास आली आहे. ग्रीन पाससाठी कोविशील्ड या लसीला अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाहीये. युरोपिएन वैद्यकीय संस्थेने (EMA) कोविशील्डला मंजुरी का दिली नाही याचं कारणही सांगितलं आहे. कोविशील्ड लस युरोपिअन महासंघांत विकण्याची परवानगी देण्यात आलेली नाहीये. यामुळे ग्रीन पाससाठी ही लस ग्राह्य धरण्यात आली नसल्याचं युरोपिअन वैद्यकीय संस्थेने सांगितलं आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने युरोपिएन वैद्यकीय संस्थेशी ईमेलद्वारे संपर्क साधला होता. ईमेलद्वारे कोविशील्ड आणि ग्रीनपासबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. या ईमेलला उत्तर देताना युरोपिएन वैद्यकीय संस्थेचे जाला ग्रुडनिक यांनी म्हटले आहे की, ‘ही लस अॅस्ट्राझेनेकाच्या वॅक्सजेवरिया उत्पादन तंत्रज्ञानाने बनवली असली तरी युरोपिएन महासंघांत विपणनाचे अधिकार कोविशील्डला मिळालेले नाहीयेत. ज्या वातावरणात ही लस बनविली जाते ते वातावरण बदलल्यास लसीच्या अंतिम उत्पादनावर परीणाम होऊ शकतो.’ याच कारणामुळे ग्रीन पाससाठी ही लस ग्राह्य धरली जात नाहीये. लस ज्या ठिकाणी बनविली जात आहे तिथल्या परिस्थितीची पाहणी , तपासणी केल्यानंतरच युरोपिएन महासंघ लसीला ग्रीनपाससाठी मंजुरी देऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे.
कोविशील्ड लस बनविणाऱ्या अॅस्ट्राझेनेका कंपनीने वॅक्सजेवरिया लसीसाठी युरोपिअन महासंघाकडे परवानगी मागितली होती, जी त्यांना देण्यात आली आहे. उत्पादकाने ग्रीनपाससाठी आपलीही लस ग्राह्य धरण्यात यावी यासाठी अर्ज केल्यानंतरच त्या लसीबाबत विचार केला जाऊ शकतो असं युरोपिएन वैद्यकीय संस्थेने सांगितलं आहे. या संस्थेने आतापर्यंत कॉमिरनाटी (बायोटेक-फायजर), मॉडर्ना, वैक्सजेवरिया (ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका) आणि जानसेन (जॉन्सन एंड जॉन्सन) या चार लसींनी ग्रीन पाससाठी परवानगी दिली आहे.
ग्रीन पास ही युरोपिअन देशांमध्ये कोणत्याही कारणासाठी येणाऱ्या लोकांसाठी तयार केलेली यंत्रणा आहे. या यंत्रणेअंतर्गत मान्यता मिळालेली लस घेतली असल्यास तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं. यावर एक क्युआर कोड असतो. ज्यात प्रवाशाला कोणती लस दिली होती आणि ती केव्हा दिली होती याची माहिती साठवून ठेवलेली असते. प्रवाशाला कोरोना झालेला असल्यास तो केव्हा झाला होता आणि त्यातून तो केव्हा बरा झाला होता, याचाही माहितीत उल्लेख असतो. हा ग्रीन पास असलेल्या व्यक्तीला क्वारंटाईन, कोरोना चाचण्या या दिव्यातून जावं लागत नाही.





























































