पुणे पोलीस दलातील डीओंची मक्तेदारी संपणार; दर आठवड्याला होणार अदला-बदली, पोलीस आयुक्तांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत कार्यरत ड्युटी ऑफिसरकडून (डीओ) कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिंक पिळवणूक थांबविण्यासाठी आता त्यांची रोटेशनप्रमाणे आठवड्याला अदला-बदली करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे चिरीमिरीसाठी कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या डीओंची मक्तेदारी संपुष्टात येणार आहे.

पोलीस ठाण्यातंर्गत ड्युटी लावण्यासाठी नियुक्त असलेल्या डीओंकडून कर्मचाऱ्यांकडून चिरीमिरी घेतल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यातच सोमवारी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील डीओ प्रमोद विक्रम कोकाटे यांनी कर्मचारी बाबासाहेब नरळे यांच्याकडून फोन पेवर टेक्नोसॅव्ही पद्धतीने लाच घेतल्याचे निष्पन्न झाले होते. त्याशिवाय ड्युटी वाटपातही तोडपाणी केल्याची चर्चा आहे. त्याप्रकरणी चौकशीअंती त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत कार्यरत असलेल्या ड्युटी ऑफिसरची मक्तेदारी संपविण्यासाठी पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार आता डीओंकडून कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वाटपात होणारी आर्थिंक वाटमारी थांबणार आहे.

पोलीस ठाण्यातील डीओ आठवड्याला बदलणार
कर्मचाऱ्यांना ड्युटी देताना होणारी आर्थिंक तोडपाणी टाळण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यासह दलातील विविध विभागातील डीओ आठवड्याला बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांना चिरीमिरी देण्याची इच्छा नसतानाही डीओंच्या मनस्तापामुळे अनेकांना दर महिन्याला आर्थिंक बोजा सोसावा लागत होता.

फोन पेवर लाच घेणारा शिपाई निलंबित
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या तत्कालीन डीओ प्रमोद विक्रम कोकाटे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी पोलीस नाईक बाबासाहेब रामचंद्र नरळे यांच्याकडून फोन पेवर लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. कोकाटे यांनी नरळे यांना जाणूनबुजून त्रास दिल्याचेही उघडकीस आले आहे. नरळे यांनी हातउसने पैसे घेतल्याचे कोकाटे यांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी कोणताही पुरावा न दिल्यामुळे कोकाटे यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिले आहेत.