
लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनासाठी लोकांचा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे कल वाढला. त्यामुळेच नवनवीन चॅनेलची भर पडली आहे. सिनेमा, वेबसीरीज यांच्यानंतर नाटकाला वाहिलेले ओटीटी प्लॅटफॉर्म दिसू लागले आहेत. अशातच आता दत्त संप्रदायाला वाहिलेले पहिले ओटीटी चॅनेल लाँच झाले आहे. ‘अवधूत चिंतन’ असे त्याचे नाव आहे. ध्येयवेडय़ा भक्तांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला आहे.
अवधूत चिंतन ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे अध्यात्म आणि मनोरंजनाचा मिलाफ आहे. गुरुदेव दत्त महाराजांविषयीची माहिती ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे. अभिनेते दिग्दर्शक असित रेडीज, मिलिंद जाधव, तेजस आर्ते यांनी चॅनेलची निर्मिती केली आहे. पिठापूर, पुरवपूर, गाणगापूर, अक्कलकोट, कारंजा, गिरनार येथील प्रमुखांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘अवधूत चिंतन’ या मोबाईल अॅपवर सुरू असलेल्या दर्जेदार मालिका मराठीसह अन्यभाषिक प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत आहेत.
n दत्तगुरूंच्या अवतारांच्या चरित्र कथा ‘अवधूत चिंतन’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरिज माध्यमातून बघता येतील. ‘श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये’ आणि स्वामी समर्थांवरील ‘स्वामी हो’ या मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. प्रवीण शांताराम यांनी दोन्ही सीरिजचे पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. दिग्दर्शनाची धुरा असित रेडीज आणि दीपक देसाई यांनी सांभाळली आहे.




























































