
हिंदुस्थानच्या पॅरा अॅथलिट्सने 29 ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये तीन पदकांची लयलूट केली. टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल हिने रौप्य पदक पटकावत इतिहास रचला. चीनच्या यींग झोऊ हिच्याकडून तिला अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले. पण पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती हिंदुस्थानची दुसरीच महिला खेळाडू ठरली. तसेच टेबल टेनिस या खेळामध्ये पदक जिंकणारी ती हिंदुस्थानची पहिलीच खेळाडू ठरलीय. याआधी 2016 रिओ पॅरालिम्पिकमध्ये दीपा मलिक हिने गोळाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

आशियाई विक्रमांसह पदके
भाविनाबेन पटेल हिच्यासह हिंदुस्थानच्या आणखी दोन खेळाडूंनी रविवारी पॅरालिम्पिकमध्ये पदके जिंकली. निशाद कुमारने 2.06 मीटर उंच उडी मारत रौप्य पदकावर मोहोर उमटवली. 41 वर्षीय विनोद कुमारने 19.91 मीटर थाळी फेकून कास्य पदकाची माळ आपल्या गळ्यात घातली.





























































