गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती, दोन वर्षांत 3 लाख 30 हजार कोटींचे औद्योगिक करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्यात मागील दोन वर्षांत 3 लाख 30 हजार कोटींचे औद्योगिक करार झाले असून गुंतवणूकदारांनी राज्याला प्रथम पसंती दर्शविली असल्याची माहिती आज राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटन प्रसंगी दिली.

40व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन प्रगती मैदान येथे करण्यात आले आहे. या मेळय़ातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे उपस्थित होत़े कोरोना महामारीच्या कठीण काळातही राज्यात मोठी गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे राज्यात चांगल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असून याचा लाभ महाराष्ट्रातील नागरिकांना होईल. महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकीकरणात नेहमीच पुढारलेले राज्य राहिले असल्याचा उल्लेख करीत या औद्योगिक विकासाच्या घोडदौडीची प्रगती महाराष्ट्र दालनातही दिसत असल्याचे देसाई यावेळी म्हणाले. नीती आयोगाच्या सदस्याने या वसाहतीला भेट दिली असून येथील पायाभूत सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दालन राज्याच्या प्रगतीचा आरसा

महाराष्ट्राचे दालन कलात्मक आहे. दालन पाहिल्यानंतर त्यात महाराष्ट्र राज्याची छाप दिसते. संपूर्ण मेळय़ात महाराष्ट्राचे दालन आकर्षणाचे पेंद्र दिसत आहे. राज्याची औद्योगिक प्रगती तसेच राज्यातील लघु उद्योग एकाच ठिकाणी मांडण्यात आले आहेत. इलेक्ट्रिकल व्हेईकल उभे केले आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आरसा हे दालन असल्याचे उद्योग मंत्री म्हणाले.

राज्यात विविध 50 क्लस्टर

खेडय़ांमध्ये जी संस्कृती आहे तिला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन हस्तकलेच्या, चामडय़ांच्या वस्तू, वस्त्र, खाद्यपदार्थ, बांबू, रबर, टेरी टॉवेल या उद्योग समूहांचे निर्माण केले आहे. सध्या राज्यात 50 कल्सटर तयार केले आहेत व भविष्यात मागणीनुसार अधिक क्लस्टर निर्माण केले जातील. यामध्ये महाराष्ट्राचे राजवस्त्र असणारी पैठणीचे क्लस्टर तयार केल्याचे देसाई यांनी सांगितले.

आंतराराष्ट्रीय दर्जाचे शेंद्रा औद्योगिक वसाहत केंद्र

संभाजीनगर जिह्यातील शेंद्रा येथे अंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचे काम सुरू आहे. ही वसाहत देशातील सर्वात महत्त्वाची अशी औद्योगिक वसाहत असल्याचे सुभाष देसाई म्हणाले.