
पराकोटीच्या अंधश्रद्धेमुळे कधीकधी जिवावर बेततील असे प्रसंग घडू शकतात. मेक्सिको येथील एका महिलेवर असाच दुर्दैवी प्रसंग ओढवला असून त्यात तिचा मृत्यू झाला आहे.
या महिलेचं नाव पेर्ला एन असं आहे. मेक्सिको येथे राहणाऱ्या पेर्ला हिच्या अंगात भूत येत असल्याचा तिच्या घरच्यांना संशय होता. त्यामुळे तिच्यावर काही अघोरी उपाय करण्यात येत होते. त्यात यश येत नाही अशी धारणा झाल्यामुळे पेर्लाच्या कुटुंबाने एक प्राचीन मानला जाणारा उपाय करायचं ठरवलं.
या उपायाला टोड थेरपी असं म्हटलं जातं. टोड म्हणजे बेडुक होय. लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांमध्ये हा उपाय करून लोकांचा इलाज केल्याचा दावा केला जातो. या उपायात विषारी बेडकांचा वापर केला जातो. पेर्ला हिला तिचे कुटुंबीय अशाच उपाय करणाऱ्या थेरपिस्टकडे घेऊन गेले.
पेर्लाला पेरुवियन बेडकाच्या विषाचा धूर दिला गेला. त्यावेळी तिच्यासोबत अन्य काही जणांवरही हाच उपाय केला गेला. हा धूर घेतल्यानंतर पेर्लाला अस्वस्थ वाटू लागलं. धुराच्या रुपाने तिच्या अंगात विष भिनल्याने तिचा तडफडून मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी जुआन पाब्लो आणि जुआन डिएगो अशा दोघांना अटक केली आहे. या दोघांनीच पेर्लावर धुराचा प्रयोग केला होता.
काही दिवसांपूर्वी पॉर्न स्टार नाको विडल हिने जोश लुईस नावाच्या फॅशन फोटोग्राफरला असंच कोलोराडो नदीत सापडणाऱ्या बेडकाचं विष दिलं होतं. त्यात त्याचा मृत्यू झाला होता.



























































