सोन्याच्या दरात झाली वाढ! वाचा काय आहेत किमती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचांदीचे दर जाहीर करण्यात आले आहेत. या दरांनुसार सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदीही महागली आहे.

या दरांविषयी इब्जारेट्स नावाच्या वेबसाईटने माहिती दिली आहे. 24 कॅरेट शुद्धतेचं सोनं 49 हजार 739 रुपये प्रतितोळा मिळत आहे. त्यामुळे बऱ्याच काळाने सोनं 50 हजारनजीक पोहोचलं आहे. तर 23 कॅरेट सोनं 49540 रुपये प्रतितोळा, 22 कॅरेट सोनं 45561 रुपये इतकं झालं आहे.

तर 999 शुद्घता असलेली एक किलो चांदी 63869 रुपये प्रतिकिलो इतकी विकली जात आहे. गेल्या आठवड्यात हेच दर 62157 इतके होते. या आठवड्यात चांदीचे दर वाढले आहेत. गेल्या शुक्रवारी हे दर वेगळे होते. शुक्रवारच्या तुलनेने सोन्याच्या 24, 23 आणि 22 कॅरेटच्या दरांमध्ये अनुक्रमे 819, 816 आणि 750 रुपयांची वाढ झालेली दिसून आली आहे.

Stock Market – शेअर मार्केटमध्ये हाहाकार, सेन्सेक्स 1600 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान

अंकांवरून ओळखा सोन्याची शुद्धता

सोन्यात जितक्या प्रमाणात शुद्धता असते, त्याचं परिमाण ठरलेलं असतं. 999 असे अंक लिहिलेलं सोनं 24 कॅरेटचं असतं, त्यापासून जास्तीत जास्त बिस्कीटं, वळं किंवा सोन्याचं नाणं बनवता येतं. पण दागिने बनवण्यासाठी त्यात अशुद्धी असावी लागते. 995 असा अंक ज्या दागिन्यांवर असतो ते 23 कॅरेट सोन्यापासून बनवले जातात.

916 असा अंक लिहिलेलं सोनं हे 22 कॅरेटचं असतं. बहुतांश सोन्याचे दागिने हे 22 कॅरेटमध्येच तयार होतात. मात्र, जर या सोन्यात हिरे किंवा रत्न जडवली जाणार असतील तर 22 कॅरेट सोनं ती रत्न पकडून ठेवू शकत नाहीत. त्यामुळे हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी 750 असा अंक लिहिलेलं 18 कॅरेट सोनं वापरलं जातं. त्याहीपेक्षा कमी दरात हिऱ्यांचे दागिने हवे असतील तर 585 अंक लिहिलेलं 14 कॅरेट सोनं देखील वापरतात.