पावसाची जावली उन्हाळ्यात तहानली, 31 गावे 17 वाडय़ांवर भीषण पाणीटंचाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडण्याचा विक्रम जावली तालुक्याच्या नावावर अबाधित आहे. मात्र, याच तालुक्यातील 31 गावे आणि 17 वाडय़ावस्त्यांवर सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. वर्षानुवर्षे उन्हाळ्यामध्ये जावळी तालुक्यात पाणीटंचाई पाचवीला पूजलेली आहे. कोटय़वधी रुपये खर्च करूनही पाणीटंचाई दूर झाली नाही. कन्हेर धरण उशाला असूनही या विभागांमध्ये डोंगरकपाऱयांमध्ये पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर येत आहे.

म्हाते बुद्रूक, मांजरी खुर्द, थोरली काळोशी, कुसुंबी, बाजारवाडी, बौद्ध वस्ती, सांगवी तर्फ मेढा, सांगवी मुरा, मोरावळे, खामकरवाडी, तेटली, शिवाजी वाडी, तेकली, मोरा, केळघर, तरफ, असोशी, सुतार वस्ती, बावळे, भुतेघर, भुतेघर मुरा, धुंद रेंगडी, कुरशी वारणे वस्ती, बौद्ध वस्ती, रेंगडी मोरावळ, बामनोली, कसबे भोगवली तर्फ मेढा वस्ती, भोगावली मुरा, नमनिपाणी तेटली. मुनावळे, रुईघर, गणेश पेठ, बोंडारवाडी, नांदगणे, पूनवडी, डांगरेघर, वातंबे अशा 31 गावे व 17 वाडय़ा-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या गावांमधील कूपनलिकांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.