गुन्हे दाखल झालेले ड्रायव्हर गिरवणार पुन्हा वाहतुकीचे धडे; परिवहन विभागाचा बेशिस्त चालकांना चांगलाच धडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहन चालविताना ड्रायव्हर वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असतात. अशा बेशिस्त चालकांमुळे अनेकदा अपघात घडून त्यांचा स्वतःचा जीव तर धोक्यात येतोच, शिवाय प्रामाणिकपणे ड्रायव्हिंग करणाऱ्यांचेही निष्कारण प्राण जाऊ शकतात. त्यामुळे अशा  गुन्हे ‘दखलबाज’ वाहनचालकांना पुन्हा ड्रायव्हिंगचे धडे शिकविण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.

मुंबईत वाहन अपघातात दिवसाला सरासरी एकाचा मृत्यू होत असतो. विरुद्ध दिशेला वाहन चालविणे, वेगाने वाहन चालविणे, लाल सिग्नल ओलांडणे, ओव्हरटेक करणे अशा प्रकारचे गुन्हे करताना थेट मृत्यूशीच गाठ असते. त्यामुळे रस्ते वाहतुकीला शिस्त आणून एक चांगला नागरिक घडविण्यासाठी राज्य परिवहन विभागाने नवा पायंडा पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

फौजदारी गुन्हा

राँग साइडने येणाऱया ड्रायव्हरवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला आहे. अशा प्रकारे वाहतुकीचे नियम मोडल्याचे गुन्हे दाखल झालेल्या चालकांच्या वाहतूक प्रशिक्षणाची पुन्हा एबीसीडी सुरू होणार आहे.

येथे होणार उजळणी…

राज्य परिवहन विभाग आपल्या कार्यालयात खास प्रशिक्षण हॉल तयार केला असून तेथे चालकांचे प्रबोधन करण्यात येत असते. येथे सिम्युलेटरद्वारे चालकांचे ट्रेनिंग होत असते. आता येथे गुन्हे दाखल झालेल्या ड्रायव्हरसाठी उजळणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

वाहतुकीचे नियम शिकवणार

 गुन्हे दाखल झालेल्या ड्रायव्हरना वाहतुकीचे नियम तसेच वाहतूक चिन्हांची ओळख, रोडवरील दिशादर्शक फलक वाचणे, शिवाय डोळे व श्रवणक्षमतेची चाचणी अशी एकंदरच ‘मेडिकल फिटनेस’ द्यावी लागणार आहे.

मुंबई शहरातील अपघातांची संख्या

साल         2018      2019   2020     2021

अपघात     3139       2872   1812       2230