लश्कर-ए-तोयबाच्या आणखी एकाला अटक, महाराष्ट्र एटीएसची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या आणखी एकाला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ने जम्मू-कश्मीरच्या किश्तवार येथून अटक केली. आफताब हुसेन शाह असे त्याचे नाव आहे. तो लश्कर-ए-तोयबामध्ये तरुणांना देशविघातक कारवाईसाठी भरती करण्याचे काम करत होता.

गेल्याच आठवडय़ात एटीएसने पुणे येथे कारवाई करून मोह्हमद जुनैद मोहम्मदला अटक केली होती. मोहम्मद जुनेद हा लश्कर-ए-तोयबाचा संपर्कामध्ये होता. त्याने शस्त्र्ाs आणि दारूगोळा खरेदीसाठी फंडिंग केले होते. तसेच जुनेदने राज्यात विविध ठिकाणी रेकीदेखील केली होती. जुनैदच्या चौकशीत आफताबची माहिती एटीएसला मिळाली. त्यानंतर एटीएसचे पथक श्रीनगर गेले. एटीएसच्या तीन पथकांनी कारगील, गंधरबल, श्रीनगर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. बुधवारी रात्री किश्तवार येथून आफताबला एटीएसने ताब्यात घेतले. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले. आफताब हा मूळचा जम्मू-कश्मीरचा रहिवासी असून तो व्यवसायाने सुतार आहे. त्याची किश्तवार येथे जमीन आहे. आफताब हा जुनेद आणि परदेशात कार्यरत असलेल्या या संघटनेचे हस्तक यांच्यामधील दुवा आहे.