बिहारमध्ये धर्मांतर कायदा करणार नाही! नितीशकुमारांचा भाजपला ‘दे धक्का’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये धर्मांतर कायदा करणार नाही, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी भाजपला मोठा धक्का दिला. जेडीयूसोबत सत्तेत असलेल्या भाजपचे अनेक नेते धर्मांतर कायदा करण्यासाठी आग्रही आहेत. त्यांनी तशा प्रकारची मागणी वारंवार केली. त्यानंतरही मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यात धर्मांतर कायद्याची गरज नसल्याचे जाहीर करून भाजपच्या राजकीय डावपेचांना झटका दिला.

भाजपशासित राज्यांनी धर्मांतर कायद्यासाठी पुढाकार घेतला आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपसोबत आघाडी बनवून सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे बिहारमध्येही धर्मांतर कायदा केली जाण्याची शक्यता होती. मात्र नितीशकुमार यांनी बुधवारी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना धर्मांतर कायद्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. राज्यात सर्व समाजाचे लोक शांततेने एकत्र नांदत आहेत. सर्वत्र एकतेचे, शांततेचे वातावरण आहे. अशा स्थितीत धर्मांतरविरोधी कायद्याची गरजच काय, असा सवाल करीत त्यांनी हा कायदा करण्यास नकार दर्शवला. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी धर्मांतरविरोधी कायदा कठोर करण्याची मागणी केली होती.