
हज यात्रा या आठवड्यात सुरु होणार आहे. कोरोना महामारीनंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे ही यात्रा होणार असून इथे अनियंत्रित गर्दी टाळण्यासाठी सौदी अरेबियाने परवान्याशिवाय येणाऱ्यांना अटक करणार असल्याचे आदेश दिले आहेत. अटक केल्यानंतर त्यांना दंडही ठोठावला जाणार आहे. सौदी अरेबियाने ही कारवाई सुरू केली असून परवान्याशिवाय हज यात्रेसाठी आलेल्या 300 मुसलमानांना अटक करण्यात आली आहे.
हज यात्रेचे सुरक्षा प्रमुख लेफ्टनंट मोहम्मद अल बसामी यांनी एक पत्रकार परिषद घेत परवान्याशिवाय आलेल्यांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. यामध्ये त्यांनी अटक केलेल्यांवर 10 हजार सौदी रियाल म्हणजेच जवळपास 2 लाख 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मक्का शहराभोवतीची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचेही बसामी यांनी सांगितले. जवळपास 1 लाख लोकांचा आणि 69 हजार वाहनांचा या परिसरातील प्रवेश रोखण्यात आला आहे. यावर्षी फक्त 10 लाख लोकांना हज यात्रेची परवानगी देण्यात आली असून त्यातील 8 लाख 50 हजार हे परदेशी नागरीक आहेत.
कोरोनामुळे गेली २ वर्ष हज यात्रा झाली नव्हती. 2019 साली म्हणजेच कोरोना उद्रेकापूर्वी 25 लाख लोकं हज यात्रेत सामील झाली होती. गेल्या वर्षी हज यात्रेला लसीकरण पूर्ण झालेल्या फक्त 65 हजार नागरिकांनाच यात्रेची परवानगी देण्यात आली होती.
























































