
डिलाईल रोड रेल्वे पुलाची तसेच वरळी बीडीडी गृह प्रकल्पाच्या कामाची पाहणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केली. मुंबई महानगरपालिका आणि रेल्वेच्या माध्यमातून डिलाईल रोड येथे बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून रेंगाळले होते. वरळी मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाला पुन्हा एकदा वेग आला आहे.
लोअर परेल येथील रेल्वे मार्गावरील पूल उभारणीचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडले होते. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर या पुलाच्या कामाला वेग आला आहे. या पुलाच्या कामाची पाहणी आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केली आणि कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुनील शिंदे, माजी नगरसेविका स्नेहल आंबेकर, युवासेनेचे साईनाथ दुर्गे, पालिका-रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
वरळी मतदारसंघातील लोअर परेल सेंच्युरी मिल वसाहत परिसरातील बिल्डिंग नं. 1 ते 14 येथे लादीकरण व काँक्रीटीकरण, ओपन शेड व रंगमंचाचे नूतनीकरण तसेच रस्त्याचे डांबरीकरण आदी विकासकामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
मविआमुळे वरळी बीडीडी गृह प्रकल्पाला गती
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांना चांगली घरे मिळावीत यासाठी पुढाकार घेतला. यामुळे वर्षानुवर्षे रखडलेला वरळी बीडीडी गृह प्रकल्पाला गती मिळाली आणि एक चांगली सुरुवात झाली. येथील रहिवाशांनी महाविकास आघाडी सरकारवर दाखविलेल्या विश्वासामुळे हा प्रकल्प पुढे जाण्यास मदत झाल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

























































