जयंत पाटील निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिशा सॅलियन एसआयटी चौकशी प्रकरणी विरोधी सदस्यांना बोलण्यास संधी दिली जात नसल्याच्या मुद्यावरून ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’ असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी केले. या मुद्यावरून त्यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली.

विधानसभेत दिशा सालियन प्रकरणावरून गदारोळ सुरू होता. या मुद्यावर सत्ताधारी पक्षाचेच आमदार आक्रमक झाले होते. तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांनी या दरम्यान विरोधी बाकांवरील सदस्यांना बोलण्याची संधी दिली नाही. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील हे बोलण्यासाठी परवानगी मागत होते. मात्र, त्यांना संधी दिली नाही.

दिशा प्रकरणाची एसआयटी चौकशी घोषित केल्यानंतर अजित पवार यांनी ही बाब राहुल नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी पक्षाच्या चौदा सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाते. आमच्याकडून भास्कर जाधव यांना या प्रकरणी बोलण्याची संधी द्या, अशी मागणी अजित पवार यांनी केली. तेव्हा , विरोधी पक्षनेता म्हणून आपल्याला बोलण्याची संधी दिली आहे. आता पुरवणी मागण्यांवर बोला, असे सांगत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुढील कामकाज पुकारले. दरम्यानच्या काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार आपापल्या जागा सोडून पुढे आले होते. सभाग़हात गोंधळाची स्थिती होती. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून हे वक्तव्य केले. या शब्दावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतप्त झाले.सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी या शब्दाला जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तब्बल चार वेळा तहकूब करावे लागले.

संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मांडला. राहुल नार्वेकर यांनी तो ठराव मतास टाकून बहुमताने मंजूर केला. जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत निलंबन करण्यात आले.

अजित पवारांची दिलगिरी

त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अध्यक्षांना उद्देशून जयंत पाटील यांनी वापरलेल्या शब्दाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. निलंबन मागे घेण्यासाठी आपण दिलगिरी व्यक्त केली नाही. तर झालेली चूक आपल्याला मान्य असून आमच्याविषयी जनतेत चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधान भवन आवारात प्रतिबंध

निलंबन कालावधीत जयंत पाटील यांना मुंबई आणि नागपूर येथील विधानभवनाच्या आवारात प्रतिबंध करण्यात आला आहे. गेल्या सलग 32 वर्षाच्या त्यांच्या संसदीय कारकिर्दीत जयंत पाटील यांच्यावर झालेली ही बहुधा पहिलीच कारवाई आहे.