‘नाशिक पदवीधर’साठी नगर जिल्हा ठरणार ‘किंगमेकर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नगर जिल्हा उमेदवारांसाठी ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचे मतदारांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. नगर जिह्यातून जो उमेदवार जास्त मतदान घेईल, तोच निवडणुकीत बाजी मारण्याची शक्यता आहे. कारण एकूण मतदारांपैकी तब्ब्ल 44 टक्के मतदार नगर जिह्यातील आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान असून, 2 फेबुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून, नाशिक विभागातील 5 जिह्यांत एकूण 2 लाख 62 हजार 731 मतदार आहेत.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाने अर्ज मागविले होते. त्यानंतर प्रशासनाने प्रारूप मतदार यादी जाहीर केली. या यादीवर दावे व हरकती मागविण्यात आल्या. त्यानुसार पहिल्या पुरवणीत 48 हजार 178 मतदारांची नोंद झाली. त्यामध्ये 1645 मतदारांची नावे दुबार आढळल्याने वगळण्यात आली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुन्हा 29 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 पर्यंत मतदार नोंदणीची संधी देण्यात आली. त्यानुसार दुसऱया पुरवणीत 1 हजार 924 मतदारांची भर पडली. त्यानंतर दुसऱया पुरवणी वगळणीत 2 हजार 643 नावे दुबार आढळली. त्यामुळे ही नावे वगळून नुकतीच जिह्याची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. विभागात सर्वाधिक मतदार नगर जिह्यात आहेत. नगरमध्ये 1 लाख 15 हजार 638 मतदार (44 टक्के), नाशिक जिह्यात 69 हजार 652 (25 टक्के), जळगाव जिह्यात 35 हजार 58 मतदार (13 टक्के), धुळे जिह्यात 23 हजार 412 मतदार (10 टक्के), नंदूरबार जिह्यात 18 हजार 971 (7 टक्के) इतके मतदार आहेत.

नगर जिह्याची अंतिम मतदारसंख्या

अकोले तालुका 8112 मतदार, संगमनेर 29115, राहाता 15257, कोपरगाव 8464, श्रीरामपूर 8131, राहुरी 7770, नेवासा 6885, नगर 10384, पाथर्डी 4282, शेवगाव 4143, पारनेर 3760, श्रीगोंदा 4385, कर्जत 2896, जामखेड तालुका 2054 मतदार.

नगर जिह्यातच सर्वाधिक मतदार केंद्रे

नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वाधिक मतदान केंद्रे नगर जिह्यात असून, मतदान केंद्रांची संख्या 147 इतकी आहे. नाशिकमध्ये 99, जळगाव जिह्यात 40, धुळ्यात 29 आणि नंदूरबार जिह्यात 23 मतदान केंद्रे आहेत. विभागात एकूण 338 मतदान केंद्रे आहेत.