
पालघर येथील बेपत्ता डॉ. सदिच्छा सानेचा शोध घेण्यासाठी हिंदुस्थानच्या नौदलातील स्पेशालिस्ट डायवरची मदत घेण्यात आली. मिथू सिंगने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी क्राईम सिन केला. क्राईम सिन केल्यानंतर आज नौदलाच्या डायवरने बँड स्टॅन्ड येथील समुद्रात शोध मोहीम हाती घेतली. तीन तास ही मोहीम सुरू होती. ही मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
नोव्हेंबर 2021 ला डॉ. सदिच्छा ही परीक्षेसाठी घरातून निघाली. ती घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी बोईसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सदिच्छाचे शेवटचे लोकेशन वांद्रे बँड स्टॅन्डला येत असल्याने तिच्या कुटुंबीयांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. याचा तपास क्राईम ब्रँच युनिट 9 कडे सोपवण्यात आला. क्राईम ब्रँचच्या पथकाने मिथूची चौकशी केली होती. मात्र तो सहकार्य करत नव्हता. अखेर पोलिसांना मिथूबाबत भक्कम पुरावे हाती लागल्याने पोलिसांनी मिथू आणि अब्दुलला अटक केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिथू हा सदिच्छाला बँड स्टॅन्ड येथे भेटल्यानंतर लाईफ सेव्हिंग रिंग घेऊन जात असल्याचे दिसले आहे. तसेच त्याने घरी गेल्यावर सदिच्छाला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्या दोन्हीबाबत पोलिसांनी मिथूला विचारणा केली असता त्याने पोलिसांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
मिथूने चौकशीदरम्यान पोलिसांना सदिच्छाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली. मिथूच्या चौकशीनंतर पोलिसांनी बँड स्टॅन्ड परिसरात क्राईम सिन केला. सदिच्छाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नौदलाच्या डायवरची मदत घेतली.डायवरने समुद्रात सदिच्छाचा शोध घेण्यास सुरुवात केली. डायवरचे तीन तास ऑपरेशन सुरू होते. शनिवारी पुन्हा डायवरच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली जाणार आहे.






























































