पुण्यात कमळाबाईवर ब्रह्मवृंदाचा कोप, पुणेरी फलक झळकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाला जाणूनबुजून डावलल्यामुळे पुण्यातील ब्राह्मण समाज संतप्त झाला आहे. आजवर पुण्यात भाजपने आमच्या मतांवर राजकारण केले; मात्र आता चिंचवडमध्ये जगताप कुटुंबाला न्याय देताना कसब्यात अन्याय कशासाठी? याची पिंमत भाजपला मोजावी लागेल, असा थेट इशाराच ब्राह्मण समाजाने दिला असून, यासंबंधीचे पोस्टर्स, बॅनर्स झळकले आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, कमळाबाईविरुद्ध ब्रह्मवृंदाचा कोप झाल्याने प्रदेश भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे.

आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा व चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही जागा भाजपकडे होत्या. भाजपने अपेक्षेप्रमाणे चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली; परंतु कसब्यात टिळक कुटुंबाला थेट डावलले. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक इच्छुक असतानाही हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. आजारी असतानाही मुक्ता टिळक यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले. भाजपने याची जाणीव ठेवली नाही त्यामुळे शैलेश टिळक यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी मीडियाशी बोलताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

भाजपकडून आजवर फक्त ब्राह्मण उमेदवार

पुण्यात कसबा पेठ मतदारसंघात 13 ते 15 टक्के तर कोथरूडमध्ये 22 ते 25 टक्के ब्राह्मण मतदार आहे. या निर्णायक मतांच्या आधारावरच कसब्यात भाजप 40 वर्षे विजयी होत आली.

कसब्यात भाजपने आजवर फक्त ब्राह्मण उमेदवार दिले. 1978ला जनसंघाचे अरविंद लेले आमदार होते. 1980ला पुन्हा ते विजयी झाले. 1990ला अण्णा जोशी आमदार होते. 1995 ते 2014 असे पाच टर्म गिरीष बापट आमदार राहिले. 2019ला मुक्ता टिळक निवडून आल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकीतच आम्हला का डावलले, असा प्रश्न ब्राह्मण समाज करत आहे.

…आणि पोस्टर्स झळकले

टिळक कुटुंबाला डावलल्यामुळे पुण्यात ब्रह्मवृंदाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शनिवारवाडय़ाच्या भिंतीसह अलका चौक, साहित्य परिषद, स. प. महाविद्यालय, महाराणा प्रताप उद्यान, फडके हौद, दांडेकर पूल आदी 24 चौकांमध्ये भाजपविरुद्ध पोस्टर्स, बॅनर्स झळकले आहेत. यामुळे चर्चेला उधान आले.

पोस्टर्स, बॅनरवरील मजकूर खूप बोलका आहे. कुलकर्णीचा मतदारसंघ गेला म्हणजे 2019ला मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी डावलून भाजपने मंत्री चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली होती. या पोटनिवडणुकीत ‘टिळकांचा मतदारसंघ गेला.’ ‘आता नंबर बापटांचा का?’ याचा अर्थ 2024च्या लोकसभा निवडणुकीत खासदार गिरीष बापट यांचीही उमेदवारी कट करणार का? असा प्रश्न भाजपला विचारला आहे.

रवींद्र धंगेकरांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर  यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे, अर्ज दाखल करण्यापूर्वी धंगेकर हे केसरी वाडय़ात आले. रोहित टिळक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली.

दरम्यान, ब्राह्मण समाजातील विविध संघटनांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली. केसरीवाडय़ावर आज भेटीगाठीचे सत्र सुरू होते.

हिंदू महासंघाकडून आनंद दवे निवडणूक लढवणार

भाजपला वाढविण्यासाठी ज्या एकमेव ब्राह्मण समाजाने साथ दिली त्या समाजालाच वाळीत टाकण्याचे काम भाजप करीत आहे. भाजपला काही जातींची केवळ मते हवीत. त्या जाती नको असतात. कोथरूडपाठोपाठ कसब्यातही ते चित्र बघायला मिळाले. प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व मिळायला हवे. मी हिंदू महासंघाकडून कसब्यातून निवडणूक लढवणार, असे आनंद दवे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना जाहीर केले. दरम्यान, दवे यांनी शैलेश टिळक यांचीही भेट घेतली.

काँग्रेसचे दाभेकरही अर्ज भरणार

कसबा पोटनिवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर पक्षावर नाराज असून, ते उद्या अर्ज भरण्याची शक्यता आहे.