
जालना येथे 16 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात दोन ठिकाणी आयोजित तीन बालविवाह जिल्हा पोलीस दलाच्या दामिनी पथक, अवैध मानवी व्यापार प्रतिबंध शाखा आणि बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात यश आले आहे. जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शिरनेर येथील 16 वर्षांच्या दोन चुलत बहिणींचा गेवराई तालुक्यातील दोन सख्ख्या भावासोबत विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच, जाफराबाद तालुक्यातील वरुड बु. येथेही एका 16 वर्षांच्या मुलीचा विवाह सोहळा गुरुवारी होणार होता. या विवाह सोहळ्यातील तीनही मुली अल्पवयीन असल्याची माहिती दामिनी पथक आणि अवैध मानवी व्यापार प्रतिबंध शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक रंजना पाटील यांना मिळाली होती.
पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रंजना पाटील यांनी बालसरंक्षण अधिकारी गजानन इंगळे यांना सोबत घेऊन पथकासह शिरनेर आणि वरुड बु. हे दोन्ही गावे गाठली. यावेळी दोन्ही ठिकाणी लग्नाचा मंडप उभारणी आणि तयारी सुरू होती. पाटील यांनी यावेळी वधुपिता आणि नातेवाईकांची समजूत काढून त्यांना कायद्याच्या दृष्टीने अल्पवयीन मुलीचे लग्न करणे योग्य नसल्याचे पटवून दिले. यावेळी वधुपिता आणि नातेवाईक यांचे मतपरिवर्तन होऊन, त्यांनी मुलगी वयात आल्यानंतरच लग्न करण्याची हमी देऊन, उद्याचा आयोजित विवाह सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक आणि अवैध मानवी व्यापार प्रतिबंध शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक रंजना पाटील, बाल सरक्षण अधिकारी इंगळे, सहायक फौजदार रवी जोशी, हवालदार संजय गवळी, आरती साबळे, रेणुका राठोड, चालक संजय कुलकर्णी आदींनी कामगिरी केली आहे.


























































