
एसटी कामगारांना वेळेवर पगार मिळावा, त्यांचे कल्याण व्हावे म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. मिंधे सरकारच्या काळात एसटीचे विलीनीकरण सोडा, पगार पण वेळेवर मिळत नाहीत, असा हल्लाबोल शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी आज केला.
एसटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांच्यात रोष आहे. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी खासदार अरविंद सावंत यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी सावंत म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना एसटी कामगारांना वेळेवर वेतन मिळावे म्हणून ठराव केला गेला होता. तत्कालीन परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी महामंडळाला एक हजार कोटी रुपये दिले होते. तत्पूर्वी शिवसेना नेते दिवाकर रावते हे परिवहनमंत्री असताना त्यांनी मुलींची एसटीमध्ये भरती केली होती, कन्या योजना आणल्या होत्या.
एसटी कामगारांच्या संपाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपचे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आझाद मैदानात आंदोलन केले होते. ते आज कुठे गेले? त्यांचा कुठेही आवाज नाही असे खासदार सावंत म्हणाले.
एसटी कामगारांचे दुर्दैव असे की, ते प्रलोभनाला लवकर बळी पडतात. आता एसटीच्या विलीनीकरणाचे काय झाले, असा सवालही त्यांनी केला. यातूनच राज्याचा कारभार कसा चालला आहे हे समजते, अशी टीका त्यांनी केली. आता कोणाच्या मागे जायचे याचा विचार एसटी कामगारांनी केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. एसटी कामगारांनी फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहावे असा सल्लाही त्यांनी दिला.



























































