
गेल्या महिन्यात बीसीसीआयने करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून अजिंक्य रहाणेला वगळल्यानंतर त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली होती, पण सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजीमुळे चर्चेत आलेल्या अजिंक्य रहाणेची जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यासाठी झालेली निवड पाहून साऱयांनीच त्याचे पुनरागमन आयपीएलमुळे झाल्याची बोंब सुरू केली. मात्र अजिंक्यची निवडही आयपीएलमुळे नसून रणजी करंडक स्पर्धेत दमदार केलेल्या फलंदाजीमुळे झाल्याचे सुनील गावसकर म्हणाले. रणजी स्पर्धेत 58 च्या सरासरीने ठोकलेल्या 634 धावांमुळेच त्याला डब्ल्यूटीसीचे तिकीट मिळाल्याचे त्यांचे स्पष्ट मत आहे.
कसोटीतील अपयशी कामगिरीमुळे अजिंक्यला जानेवारी 2022 मध्ये संघातून वगळण्यात आले होते. तेव्हापासून तो रणजीत खेळत होता. यंदाच्या रणजी मोसमात तो मुंबईचा कर्णधार होता, पण मुंबई साखळीतच बाद झाली. पण या मोसमात अजिंक्यने दोन दमदार शतके ठोकली होती. त्याची हीच कामगिरी त्याला लंडनला घेऊन चाललीय, असे गावसकर यांचे स्पष्ट मत आहे.
एवढेच नव्हे तर गावसकरांनी डब्ल्यूटीसीच्या संघात कोण असू शकतो याचेही अंदाज बांधले आहेत. सलामीला रोहित शर्माबरोबर शुभमन गिल यायला हवा असे त्यांना वाटते. पुढे चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर अजिंक्य खेळेल. मात्र सहाव्या क्रमांकावर राहुल असायला हवा. तोच यष्टिरक्षणही करेल. मग रवींद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन असतील. त्यानंतर जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी आणि सिराज गोलंदाजीची धुरा सांभाळतील.
गावसकरांचा संभाव्य संघ
रोहित शर्मा
शुभमन गिल
चेतेश्वर पुजारा
विराट कोहली
अजिंक्य रहाणे
के एल राहुल
रवींद्र जडेजा
रविचंद्रन अश्विन
जयदेव उनाडकट
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज




























































