
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘शिवभोजन थाळी योजने’ची बिले नवीन सरकार स्थापन झाल्यापासून आजतागायत थकीत आहेत. ही केंद्रे त्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. केंद्रचालकांनी ही केंद्रे चालविण्यास असमर्थता दर्शविली आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या पुरवठा मंत्रालयाने हे अनुदान त्वरित अदा न केल्यास नगर जिल्ह्यातील हजारो गोरगरीब उपाशी राहणार आहेत. त्यामुळे हे अनुदान तत्काळ द्यावे; अन्यथा महाराष्ट्र दिनी महसूलमंत्र्यांची गाडी रोखण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘शिवभोजन थाळी योजने’च्या माध्यमातून हातावर पोट असलेल्या अथवा उपजीविकेचे साधन नसलेल्या गोरगरीब जनतेची भूक भागत होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्य शासनाने गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये, यासाठी शिवभोजन केंद्रे सुरू केली होती. नगर शहरात सात ते आठ केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्याची संख्या आता 17 झाली आहे. शिवाय संपूर्ण नगर जिल्ह्यात मिळून ही संख्या 34 आहे. या केंद्रांना प्रत्येक थाळीमागे राज्य शासन अनुदान देत होते.
सरकार बदलल्यानंतर स्वतःला जनतेचे कैवारी म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अनुदान बंद करून टाकले. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हे अनुदान रखडल्याने आता शिवभोजन थाळी केंद्र चालविणाऱया केंद्रचालकांनाही केंद्र चालविणे अशक्य झाले आहे. केवळ राजकारण म्हणून ही योजना बंद करण्याचा घाट सरकार घालत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हे खपवून घेणार नाही. हे अनुदान तत्काळ नियमित न केल्यास 1 मे रोजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची गाडी अडवून त्यांना शहरात फिरण्यापासून रोखण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर डॉ. श्रीकांत चेमटे, अरुण झेंडे, अंबादास शिंदे, संजय आव्हाड, गौरव ढोणे, पप्पू भाले, संतोष डमाळे, महेश शेळके, दीपक भोसले, बाळासाहेब जर, अण्णा कोडम आदींच्या सह्या आहेत.




























































