जप्त केलेले 96 लाखांचे सोने विकले, हायकोर्टाने महसूल गुप्तचर संचालनालय अधिकाऱ्याकडून मागितला खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झवेरी बाजार येथील मेसर्स चौक्शी अरविंद ज्वेलर्स येथून जप्त केलेल्या 96 लाखांच्या सोन्याची विक्री केल्याचा आरोप करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने महसूल गुप्तचर संचालनालयाचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी मनीष कुमार व अतिरिक्त संचालनालय (सर्वसामान्य) विभागाने या आरोपाचे प्रत्युत्तर सादर करावे, असे आदेश दिले आहेत.

न्या. गिरीष कुलकर्णी व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. सोने विकण्याची कृती कायदेशीर आहे का, जप्त केलेला मुद्देमाल नाशवंत नसताना कोणत्या नियमांतर्गत सोन्याची विक्री करण्यात आली, जप्त केलेल्या सोन्याची विक्री बेकायदा ठरली तर याचिकाकर्त्याचे नुकसान भरून काढण्यासाठी संबंधित अधिकाऱयावर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात यावी, याचा तपशीलवार खुलासा सादर करावा, असेही न्यायालयाने नमूद केले.

मेसर्स चौक्शी अरविंद ज्वेलर्स यांनी ही याचिका केली आहे. परदेशी बनावटीची 24 कॅरेट 741.40 ग्रॅम सोन्याची बिस्किटे व 22 कॅरेट 864.41 ग्रॅम सोन्याचे कॉईन्स 21 मे 2023 रोजी दुकानातून जप्त करण्यात आले. 96,91,965 रुपये एवढी या सोन्याची किंमत आहे. हे सोने मुनीरा जहीर ममनोन यांच्याकडून विकत घेतले होते. या खरेदी व्यवहाराची सर्व कागदपत्रे महसूल विभागाकडे सादर करण्यात आली. मुनीरा यांचा जबाबही सादर करण्यात आला. हे सर्व सोने विकण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्याचीही कागदपत्रे सादर करण्यात आली. विभागाने कारवाईआधी कारणे दाखवा नोटीस बजावली नव्हती. जप्त केलेले सोने परत द्यावे, अशी विनंती वारंवार विभागाला करण्यात आली. विभागाने सोने परत केले नाही. अवैधरीत्या जप्त केलेले सोने परत करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सोने विकले असल्याचा संशयही याचिकाकर्त्यांनी व्यक्त करण्यात आला आहे.

याचिका दाखल होण्यापूर्वीच सोन्याची विल्हेवाट
11 ऑगस्ट 2023 रोजी महसूल गुप्तचर संचालनालयाचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी मनीष कुमार यांच्या सहीचे पत्र शीव येथील कपिल कुमार पारेख व झवेरी बाजार येथील मेसर्स चौक्सी अरविंद ज्वेलर्स यांना मिळाले. तुम्हाला कारणे दाखवा नोटीस वेळेत देण्यात आली आहे. जप्त केलेले सोने ज्याच्या मालकीचे आहे, त्याचा जबाब घेतल्यानंतर त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तातडीने ही याचिका करण्यात आली. ही याचिका दाखल होण्यापूर्वीच सोन्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे, असे प्रतिवादींनी न्यायालयात सांगितले.