
काही दिवसांपूर्वी एका मुलाचा कुत्रा चावल्यानंतर मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्या मुलाने वडिलांच्या कुशीतच जीव सोडल्याचा मन हेलावणारा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर देशभरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर पालिकेने रेबिजमुक्त मुंबई अभियान हाती घेतले आहे. मुंबई महानगरपालिका आणि 15 स्वयंसेवी संस्थांच्या वतीने शहरातील 15 हजार भटक्या कुत्र्यांचे रेबिज लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणानंतर प्रायोगिक तत्वावर काही भटक्या श्वानांच्या गळ्यात क्यूआर कोड असलेला पट्टा घालण्यात येणार आहेत. हे लसीकरण मोबाईल ॲपआधारित होणार असून राज्यात पहिल्यांदाच मोबाईल ॲपआधारित रेबिज लसीकरण करण्यात येणार आहे.



























































