निकृष्ट फळे, जेवणात अळ्या सापडल्या, आंबेडकर वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांचा अन्नत्याग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विश्रामबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. ठेकेदार शासनाच्या नियमानुसार जेवण देत नाहीत. जेवणात अळ्या सापडत असूनही त्याकडे समाजकल्याणचे अधिकारीही लक्ष देत नाहीत. या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन केले.

सांगलीतील विश्रामबाग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह असून, या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार वसतिगृहाची क्षमता 75 विद्यार्थ्यांची आहे. सध्या वसतिगृहात 60 ते 70 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना निकृष्ट फळांचा पुरवठा होत आहे. कित्येकवेळा जेवणात अळ्या सापडत आहेत. ठेकेदारांकडून 60 ते 70 विद्यार्थ्यांसाठी फक्त अडीच लीटर दुधाचा पुरवठा होत आहे. या दुधात पाणीच जास्त असते. या समस्यांबाबत अधिकाऱयांकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे ठेकेदार दिवसेंदिवस निकृष्ट जेवण देतच आहे. म्हणून संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करून दर्जेदार जेवण मिळावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

या आंदोलनानंतर लगेच समाजकल्याणचे सहायक आयुक्त चाचरकर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन निकृष्ट जेवणाबद्दल संबंधित शक्ती महिला बचत गटावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या दहा दिवसांत ठेका रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलन मागे घेऊन विद्यार्थी जेवणाला गेल्यानंतर एका विद्यार्थ्याच्या ताटात अळी सापडली. त्यानंतर वसतिगृहाच्या कर्मचाऱयास ही अळी दाखवून कसे जेवायचे असा प्रश्न केला. संबंधित कर्मचारीही विद्यार्थ्याच्या या प्रश्नावर निरुत्तर झाला. पालकमंत्र्यांनी याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी होऊ लागली आहे.