
नशेचा बाजार बंद करा! दोषींवर कारवाई करा,सांगली, कोल्हापुरात शिवसेनेचे जोरदार आंदोलन, निदर्शने
सांगलीसह कोल्हापूर या जिह्यामध्ये अमली पदार्थांचा विळखा वाढत असून, तरुण पिढी या नशेच्या आहारी जात आहे. राज्य सरकारच्या आशीर्वादाने हा नशेचा बाजार सुरू असल्याच्या विरोधात सांगली, कोल्हापूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करीत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱयांसह पोलीसप्रमुखांना देण्यात आले.
आज जिल्हा शिवसेनेच्या वतीने स्टेशन चौकातील बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळासमोर तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार निदर्शने, घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, ऋषिकेश पाटील, विराज बुटाले, प्रसाद रिसवडे, अनिल शेटे, रुपेश मोकाशी, किरण कांबळे, भरतकुमार पाटील, सुरेश साखळकर, लक्ष्मण वडर, विनोद शेलार, किरण पवार, श्रीकांत कोळीगिरी, शीतल थोरवे यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, सांगली जिह्यात विशेषतः सांगली, मिरज, ईश्वरपूर, विटा अशा शहरांतील कॉलेजची मैदाने, रस्त्याशेजारच्या आणि आडवाटेवरच्या जागांमध्ये नशेच्या गोळ्या घेण्याबरोबरच अन्य प्रकारच्या नशा करण्यात अगदी 20-22 वर्षांची मुले दिसू लागली आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात कुत्ता गोलीपासून ते महागडय़ा ड्रग्जपर्यंत सर्व प्रकारच्या नशेच्या गोळ्या आणि औषधे बिनदिक्कतपणे उपलब्ध होत आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे.
पंजाबपाठोपाठ महाराष्ट्रातील तरुणाईला नशेबाज करण्याचे कारस्थान सुरू आहे. गुजराती बंदरांवरून येणाऱया या नशेच्या वस्तू आणि त्याचा व्यापार करणारे लोक पकडले पाहिजेत. तरीसुद्धा अद्यापि जिह्यात अशा नशेच्या व्यापारावर वचक बसलेला नाही. गुजरात हे ड्रग्जमाफियांचे आंतरराष्ट्रीय आगार बनले आहे. यावर लवकरात लवकर पोलिसांनी नियंत्रण मिळवावे, अशी मागणी निवेदनातून केली.
पोलिसांनी दोषींवर तातडीने कारवाई करावी
ललित पाटीलच्या ड्रग्ज रॅकेटवरून सध्या राज्यात वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱयांच्या विरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकार तसेच गृहविभागाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. कोल्हापूर जिह्यातही काही ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत आहे. याकडे दुर्लक्ष होत असून, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
ड्रग्जमाफियांना काही मंत्र्यांचा मिळणारा वरदहस्त अधिकच चिंतेची बाब असल्याचे अलीकडे ललित पाटील प्रकरणावरून समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या हाती असे अमली पदार्थ सहजच मिळत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ड्रग्जमाफिया, पोलीस दल आणि राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. कोल्हापूर जिह्यातही काही ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत आहे.पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर अमली पदार्थांची विक्री होत असताना, पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. गृहमंत्र्यांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे आदेश द्यावेत. पोलीस दलाने कोम्बिंग ऑपरेशन राबवून ड्रग्जमाफियांचे कंबरडे मोडावे आणि नशेखोरीच्या विळख्यातून जनतेला वाचवावे, असे आवाहन यावेळी शिवसेना उपनेते व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.
यावेळी शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, सुनील शिंत्रे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, शशिकांत बिडकर, राजू यादव, संभाजी भोकरे, स्मिता सावंत, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे आदी शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.






























































