मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर तोफ डागत भाजप प्रवक्त्याचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नेते आणि प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही मराठा समाजाचे नेते तमाशा बघण्याची भूमिका घेत आहेत. मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, अशी तोफ डागत आपली राजकीय भूमिका 27 जुलै रोजी जाहीर करू, असे पवार यांनी स्पष्ट केले.

पिंपरी येथे पत्रकार परिषदेत एकनाथ पवार यांनी आपली भूमिका मांडली. एकनाथ पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राजीनामा पाठविला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, गेली 50 वर्षे ज्या पक्षात काम केले, घडलो त्या भाजपच्या प्राथमिक सदस्यत्व आणि प्रदेश प्रवक्तेपदाचा राजीनामा देत आहे. मराठा बांधव आरक्षण मागत असताना त्यांना हे सरकार आरक्षण देऊ शकत नाही. समाज अत्यंत आशेने या सरकारकडे पाहत असतानादेखील केवळ वेळकाढूपणा सुरू आहे. त्या सरकारच्या पक्षात शांत बसून राहण्यापेक्षा मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असे पवार यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना मी सत्तेचा कुठलाही लोभ न ठेवता राजीनामा देत आहे. माझी राजकीय भूमिका मी 27 तारखेला जाहीर करेन, असे ते म्हणाले. पवार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांनी 2014 मध्ये भोसरी विधानसभा लढवली होती. त्यावेळी त्यांना 52 हजार मते पडली होती.