
नगर तालुक्यातील देहरे गावात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू विक्रीविरोधात रणरागिणींनी एल्गार पुकारला असून, तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी हातभट्टी विक्री तातडीने बंद करण्याची मागणी केली. यावेळी रणरागिणींनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर हातभट्टी दारू ओतून आंदोलन केले.
देहरे गावात अवैध हातभट्टी दारू विक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे गावातील सामाजिक शांतता धोक्यात आली असून, राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावातील तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहेत. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. याची वरिष्ठ अधिकाऱयांनी गांभीर्याने दखल घेऊन देहरे गावातील अवैध हातभट्टी दारू विक्रीला आळा घालण्याची मागणी नागरिकांसह महिलांनी केली आहे
राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला धाब्यावर बसून गावोगावी खुलेआम गावठी दारू तयार करून विक्री होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड यांनी केला आहे. तालुक्यात बहुतांश ठिकाणी हातभट्टी आणि गावठी दारूच्या उत्पादनासाठी जंगलाचा वापर केला जातो. देहरे गावात अवैध हातभट्टी दारूचा महापूर आला आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, खुलेआम दारू विकली जात आहे. देहरे गावामध्ये नागरिकांनी अनेकवेळा ग्रामपंचायत कार्यालयाला पत्रव्यवहार करूनही गावातील हातभट्टी दारूविक्री बंद होत नाही. तसेच हातभट्टी दारूमुळे गावातील अनेक व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या आहेत. त्यामुळे गावातील महिला व पुरुषांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर हातभट्टी दारू ओतून आंदोलन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड, शकुंतला ठाणगे, सुंदरबाई ठाणगे, सविता गोपाळे, सुरेखा लोखंडे, कविता गायकवाड, पुष्पा धनवटे, संगीता धनवटे, स्वप्नाली कुसळकर,
मनोज सुरपुरे, भरत धनवटे, संतोष तेलोरे, मुन्ना शेख, छगन ठाणगे, तुषार पडागळे, सागर पवार, नंदू पडागळे, सचिन लोखंडे, रामदास पवार, रमिस शेख, अशोक धनवटे, स्वप्नील धनवटे, गणेश पाखरे, अरुण कोंडे, अमोल चिखले, किशोर कोंडे, गणपत हरेर आदींसह गावातील महिला व पुरुष मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार
– देहरे गावात मोठय़ा प्रमाणात अवैध हातभट्टी दारूविक्री सुरू आहे. गावातील नागरिकांसह तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस विभाग आंधळ्याचे सोंग घेऊन बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. गावातील हातभट्टी दारू बंद व्हावी, यासाठी लवकरच पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचे रणरागिणींनी सांगितले.





























































