
गुजरात उच्च न्यायालयात घडलेल्या एका घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. भर न्यायालयात दोन न्यायमूर्ती आपापसात भिडले असून त्यांच्यात जबरदस्त वादावादी झाली. हा वाद एवढ्या विकोपाला गेला की न्यायालयाची कार्यवाही थांबवावी लागली. त्यानंतर एक न्यायमूर्ती कोर्टरूममधून बाहेर पडले. ही घटना सोमवारी घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याची चर्चा होत आहे.
न्यायमूर्ती वीरेन वैष्णव आणि न्यायमूर्ती मौना भट्ट एका खटल्याची सुनावणी करत होते. यावेळी न्यायमूर्ती भट्ट यांनी न्यायमूर्ती वैष्णव यांच्या कानात कुजबुज करत आपला आक्षेप आणि असहमती दर्शवली. या प्रकाराने न्यायमूर्ती वैष्णव चांगलेच संतापले. व्हायरल झालेल्या या वादावादीच्या व्हिडिओमध्ये न्यायमूर्ती वैष्णव आदेश देत असल्याचे दिसत आहे. त्यावर न्यायमूर्ती भट्ट असहमत असल्याचे दिसते. त्यावर न्यायमूर्ती भट्ट न्यायमूर्ती वैष्णवच्या कानात काहीतरी कुजबुजतात. यावर न्यायमूर्ती वैष्णव संतापतात आणि त्यांना वेगळा आदेश देण्यास सांगतात.
न्यायमूर्ती वैष्णव संतापून सांगतात की, तुम्ही तुमचा आक्षेप किंवा असहमती नोंदवा. तुम्ही यापूर्वीही एका प्रकरणात असे केले आहे. इथेही करू शकतात. यावर न्यायमूर्ती भट्ट सांगतात की, येथे आक्षेप घेण्याचा किंवा असहमती दर्शवण्याचा मुद्दा नाही. त्यावर न्यायमूर्ती वैष्णव म्हणतात, तुम्ही वेगळा आदेश काढा, पण माझ्या कानात असे कुजबुजू नका. त्यांच्यातील शाब्दिक वाद वाढत गेला. हा वाद इतका विकोपाला गेला की, न्यायमूर्ती वैष्णव आपल्या जागेवरून उभे राहिले आणि म्हणाले की आता खंडपीठ इतर कोणत्याही खटल्याची सुनावणी करणार नाही आणि त्यांनी न्यायालयाची कार्यवाही थांबवली. त्यानंतर ते कोर्टरुममधून निघून गेले. गुजरात उच्च न्यायालयाने दोन न्यायमुर्तींमधील या वादावादीचा व्हिडिओ यूट्यूबवरून हटवला आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येते. त्यामुळे ही घटनाही उघड झाली होती. त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
बार आणि बेंचच्या अहवालानुसार या घटनेनंतर बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती वैष्णव दिसत नाहीत. न्यायमूर्ती भट्ट यांच्यासह न्यायमूर्ती भार्गव कारिया खंडपीठात आहेत. दोन न्यायाधीशांमधील बाचाबाची हा उच्च न्यायालयाच्या सभागृहात चर्चेचा विषय आहे. मात्र, या घटनेबाबत उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर यासंबंधी कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. याआधी सर्वोच्च न्यायालयातही अशीच एक घटना घडली होती. 2016 मध्ये एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान भर न्यायालयात न्यायमूर्ती एम.वाय. इक्बाल आणि न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्यात अशीच जबरदस्त वादावादी झाली होती.


























































