सोलर ग्रूपच्या मालकावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, विरोधकांचा विधानसभेतून सभात्याग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
NANA-PATOLE

संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्र्ाांत्राचे उत्पादन करणाऱया नागपूरमधील सोलर ग्रूपच्या इकॉनॉमिक एक्सप्लोझिव या कंपनीत रविवारी झालेल्या दुर्घटनेचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. यावर चर्चेची मागणी फेटाळण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला.

विधानसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसचे नाना पटोले यांनी नागपूरच्या बाजारगाव येथे इकॉनॉमिक एक्सप्लोझिव कंपनीत झालेल्या स्फोटाचा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला. या स्फोटात नऊ कामगारांचा मृत्यू झाला आहे.
आपल्या राज्यातील कामगार कायदा हा कामगारांच्या हिताचा नसून भांडवलदारांच्या फायद्याचा आहे, अशी टीका नाना पटोले यांनी या वेळी केली. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर या मुद्दय़ावर बोलण्याची सूचना केली. त्यानुसार प्रश्नोत्तराचा तास संपताच नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारकडून तत्काळ निवेदन व्हावे, अशी मागणी केली. मात्र अध्यक्षांनी स्थगन प्रस्तावाबाबतच्या सूचना फेटाळल्याने यावर चर्चा झाली नाही. स्थानिक आमदार अनिल देशमुख यांनाही घटनेबाबत सविस्तर भूमिका मांडता आली नाही. नार्वेकर यांनी पुढील कामकाज पुकारल्याने त्याचा निषेध म्हणून विरोधी पक्षाने सभात्याग केला.

तत्पूर्वी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले. स्फोटक तयार करणाऱया कंपनीत काम करणारे कामगार प्रशिक्षण घेतलेले हवे; परंतु येथे अकुशल कामगार अत्यल्प वेतनावर कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले आहेत. ज्याअर्थी कंपनीकडून सुरक्षा निकषांची पायमल्ली करण्यात आली तेथे सुरक्षा निकषही पाळले नाहीत. मुलींना प्रशिक्षण न देता कंत्राटी पद्धतीने कामाला लावण्यात येत असून कंपनीत कर्मचाऱयांचे शोषण होत आहे, असा आरोप करत विजय वडेट्टीवार कंपनीच्या मालकावर 302चा गुन्हा दाखल करावा आणि मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली.