
साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करून चार महिन्यांचा काळ उलटून गेला आहे. मात्र, कारखान्यांना तोडणी कार्यक्रमाचे वेळापत्रक काही जमलेले नाही. फेब्रुवारी निम्मा होऊन गेला तरी शेती सेंटर कार्यालयात नोव्हेंबरचाच तोडणी कार्यक्रम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यात ज्याचा ‘वशिला’ आहे, त्याच्याच उसाची तोड होत आहे. तसेच या भागातील कारखान्याने कार्यक्षेत्रातील ऊसतोडणीकडे दुर्लक्ष करून परराज्यातील ऊसगाळपासाठी आणण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील उसाची तोड होत नाही. शेतकऱयांना कारखान्यावर हेलपाटे मारावे लागत असल्याने ‘ऊस करणं सोपं; पण कारखान्याला पाठवणं लई अवघड’, असा संताप शेतकरी व्यक्त करीत आहेत.
यंदा वातावरणातील बदलामुळे ऊस उत्पादनात घट, त्यात वेळेत ऊसतोडणी नसल्यामुळे शेतकऱयांनीच कोयता हातात घेत तोडणी सुरू केली आहे. त्यातच यंदा ऊसदराच्या कोंडीच्या आंदोलनामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा म्हणजे दिवाळीला सुरू झाला. गेली तीन महिने ऊसतोडणी टोळ्या मनमानी पद्धतीने आणि मर्जीतल्या लोकांची ऊसतोड करत असल्याचे सर्रास दिसत आहे. एकंदरीत संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ऊसतोडणी कार्यक्रमाचे तीन तेरा व सावळागोंधळ झाला आहे. त्यामुळे प्रामाणिक ऊसउत्पादक शेतकरी वाऱयावर पडला आहे. दररोज शेती सेंटर कार्यालय, कर्मचारी यांच्याकडे हेलपाटे घालून शेतकरी वैतागले आहेत.
यंदा कमी पाऊस, खराब वातावरणाने उसाची उत्पादकता कमी झाली आहे. त्यातच वेळेत न गेल्यास अजून तोटा यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऊसतोडणी टोळ्या ज्याची खुशाली ज्यादा त्याच्यात तोड पहिली, तर ज्याचा वशिला भारी त्याच्या उसाला तोड येत असल्याचे सर्रास सुरू आहे. काही शेतकरी तर एकदा ऊसतोड आली की, लागण, खोडवी, जोडवी अनं् निडवीही ऊस घालवायला मागे पुढे पाहत नाहीत. यामध्ये सर्वसामान्य शेतकरी हतबल झाला आहे.
उसाला तुरे आल्याने वजनात झाली घट
– तसेच उभ्या उसाला तुरे आल्याने केलेला खर्चही निघणार नसून, तोटाच तोटा होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱयानेच हातात कोयता घेतला आहे. मजूर मिळेनात, घेतलेल्या मजुराचे चोचले पुरविताना नाकीनऊ आले आहे. एका व्यक्तीची तोडणी व बांधणी दिवसाची मजुरी 350 रुपये, तर चहापाणी, जेवणखाण वेगळे. ऊस ओढणी प्रती मोळी (बिंडा) 4 ते 8 रुपये. एवढं सगळं सोसून शेतकरी ऊस घालवण्यावर भर देत आहेत. ऊसतोडणी कार्यक्रम व ऊसटोळ्यांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रार केल्यास ‘ऊस घालवायचा असेल तर घालवा’, अशी भाषा वापरली जाते.
ऊसपीक वेळेत जावे लागते; उसाला तुरे येतात व वजन घटते. परिणामी केलेला खर्चही निघत नाही. कारखान्यांच्या ऊसतोडणी कार्यक्रम वेळापत्रकात वशिलेबाजी होतेय. त्यामुळे प्रामाणिक शेतकरी वाऱयावर पडला आहे. ऊसतोडीसाठी दररोज शेती सेंटर कार्यालय, कारखान्याकडे चकरा माराव्या लागत आहेत. – विजय दिनकर पाटील, आकनुर, ता. राधानगरी.






























































