इतके ‘खोके’ द्या, तरच बदली करतो! घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तांना तंबी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि अनेक अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत, मात्र ते धाब्यावर बसवून घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी केवळ ‘खोक्यां’साठी बदल्या रखडवून ठेवल्या आहेत, असा सनसनाटी आरोप शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंग चहल व अनेक अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. चहल व अन्य अतिरिक्त आयुक्तांच्या रुटिन बदल्या ओव्हरडय़ू होऊनही केल्या जात नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रशासकांना असे निर्देश दिले आहेत की, निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी मोठमोठी कामे मंजूर करून घ्या आणि इतके इतके खोके आम्हाला द्या, तरच तुमच्या बदल्या होणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

न्यायासाठी आंदोलन करणाऱयांचा अपमान का करता?
मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करत आहेत. दिल्लीतही शेतकरी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. न्यायासाठी ही आंदोलने सुरू आहेत. मात्र भाजपवाले या आंदोलकांचा अपमान करत आहेत, त्यांना ब्लॅकमेलर, शहरी नक्षली अशी लेबले लावत आहेत. न्यायासाठी आंदोलन करणाऱयांना अशी लेबल्स का लावता, असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.